Published On : Thu, Sep 23rd, 2021

महिला व बालकल्याण समिती सभापतींनी केली ‘पोटोबा’साठी जागेची पाहणी

– सहा झोनमधील प्रस्तावित जागांचे रेखाचित्र सादर करण्याचे निर्देश

नागपूर : मनपाच्या महिला व बालकल्याण समितीअंतर्गत समाजविकास विभागाद्वारे दहाही झोनमध्ये ‘पोटोबा’चे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. महिला बचत गटांच्या सक्षमीकरिता हा प्रकल्प दहाही झोनमध्ये लवकरात लवकर सुरू व्हावा, या उद्देशाने महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे व उपसभापती अर्चना पाठक यांनी पाच झोनमधील प्रस्तावित जागांची पाहणी केली.

महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतींनी लक्ष्मीनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या सहा झोनमधील जागांची पाहणी केली. यावेळी समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर उपस्थित होते. लक्ष्मीनगर झोनमधील जागेची पाहणी दरम्यान झोन सभापती पल्लवी श्यामकुळे, सहायक आयुकत गणेश राठोड, गांधीबाग झोनमधील पाहणी दरम्यान झोन सभापती श्रद्धा पाठक, सहायक अधीक्षक प्रकाश गायधने, सतरंजीपुरा झोनमध्ये झोन सभापती अभिरूची राजगिरे, सहायक अधीक्षक शाम कापसे, लकडगंज झोनमध्ये झोन सभापती मनीषा अतकरे, सहायक आयुक्त साधना पाटील, आशीनगर झोनमध्ये झोन सभापती वंदना चांदेकर, मंगळवारी झोनमध्ये झोन सभापती प्रमिला मथरानी, सहायक आयुक्त विजय हुमने आदी उपस्थित होते.

सहाही झोनमध्ये झोन सभापती तथा प्रशासनाद्वारे सूचविण्यात आलेल्या जागांची पाहणी करून त्यासंदर्भातील अडचणी महिला व बालकल्याण समिती सभापतींनी जाणून घेतल्या. जागांची पाहणी झालेल्या सर्व झोनमधील संबंधित अधिका-यांनी प्रस्तावित जागांच्या रेखाचित्रासह आवश्यक सर्व माहिती त्वरीत सादर करण्याचे निर्देश यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांनी दिले.