
नागपूर -शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमर नगर परिसरात मंगळवारी सकाळी जुन्या वादातून घडलेल्या रक्तरंजित हल्ल्याने परिसर हादरला. माजी भाडेकरूने आपल्या पूर्वीच्या घरमालकाच्या घरात घुसून तलवार आणि चाकूने बेछूट हल्ला केला. या हल्ल्यात घरात पाहुण्या म्हणून आलेल्या ४० वर्षीय संगीता राजू चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर धर्मपाल सुदाम डहाट आणि त्यांच्या पत्नी वनिता डहाट हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोशन नीलकंठ तराळ हा सुमारे वर्षभरापूर्वी काही महिन्यांसाठी डहाट दाम्पत्याच्या घरी भाड्याने राहत होता. त्यावेळी मोठ्या आवाजात रेडिओ लावणे आणि इतर कारणांवरून घरमालक त्याला वारंवार समज देत होते. त्याचाच राग मनात धरून आरोपीने हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास आरोपी तलवार आणि चाकू घेऊन डहाट यांच्या घरी पोहोचला. त्याने प्रथम धर्मपाल डहाट यांच्यावर तलवारीने वार केले. बचाव करताना त्यांच्या हाताची बोटे गंभीर जखमी झाली. त्यानंतर वनिता डहाट यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला.
याचवेळी घरात पाहुण्या म्हणून आलेल्या संगीता चौधरी या स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. आरोपीने त्यांच्यावरही तलवारीने प्राणघातक वार केला. गळ्यावर गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, संगीता चौधरी यांचा या वादाशी कोणताही संबंध नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटना घडल्यानंतर आरोपी घरातील सोफ्यावर शांतपणे बसून राहिला. दरम्यान, परिसरातील काही तरुणांनी त्याला घरातच कोंडून ठेवले. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




