नागपूर : नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. मात्र, सभेतील सर्व विषय आणि सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. सत्तापक्ष नेत्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सभेला उपस्थित राहू न शकल्याने अखेर सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापौर नीता ठाकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, तांत्रिकदृष्ट्या सत्तापक्ष नेते अनुपस्थित असतानाही सर्वसाधारण सभा घेण्यास कोणतीही अडचण नसते. मात्र, महापालिकेच्या आतापर्यंतच्या परंपरेनुसार सत्तापक्ष नेत्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे उर्वरित विषयांवर सविस्तर चर्चा व्हावी, यासाठी सभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली आहे.
सभेतील प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यासाठी अत्यंत लवकर नव्याने सर्वसाधारण सभा बोलावण्यात येणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले.





