Published On : Mon, Aug 26th, 2019

जलसंधारणाशिवाय विदर्भाचा विकास नाही : पालकमंत्री बावनकुळे

जलसंधारण मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन
सर्व पदे 3 महिन्यात भरली जातील
नाग नदी झिरो डिस्चार्ज करणार

नागपूर: विदर्भावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मृद् व जलसंधारण अप्पर आयुक्त-मुख्य अभियंता कार्यालय नागपुरात सुरु करण्यात आले असून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे केल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

अप्पर आयुक्त-मुख्य अभियंता मृद् व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी अप्पर आयुक्त सु. पा. कुशिरे, जलसंधारण अधिकारी बानुबाकोडे, अधीक्षक अभियंता, सोळंके, अधीक्षक अभियंता गवळी आदी उपस्थित होते.

विदर्भ सिंचन महामंडळ बंद झाल्यानंतर 2 वर्षात ज्या अडचणी समोर आल्या त्या सोडविण्यासाठी हे कार्यालय सुरु करणे आवश्यक होते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सकारात्मक भूमिका घेत या कार्यालयाला परवानगी दिली. विदर्भ विकासासाठी ज्या बाबी कमी आहेत, त्या उभारणे आवश्यक आहे. हे कार्यालय सुरु झाल्यानंतर जी पदे रिक्त आहेत ती पदे येत्या 3 महिन्यात भरली जाणार आहेत. त्यामुळेच जलसंधारणाचा उद्देश पूर्ण होईल, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.

नागनदीतून वाहणारे सर्व सांडपाणी महानिर्मितीच्या खापरखेडा आणि कोराडी प्रक़ल्पाला देऊन नाग नदी झिरो डिस्चार्ज केली जाणार आहे. वीज प्रक़ल्पांना पेंचचे शुध्द पाणी यापुढे दिले जाणार नाही. सांडपाणी स्वच्छ करून वीज प्रकल्पाला दिल्यानंतर त्यातील 25 टक्के शुध्द पाणी पोहरा नदीत सोडले जाईल. ते शेतकर्‍यांसाठी असेल. नाग व पोहरा या दोन्ही नद्यांमध्ये प्रत्येकी 10 बंधारे बांधून स्वच्छ पाणी अडवले जातील. त्या बंधार्‍यांमधून शेतीला पाणी घेता येईल.

नाग नदी, पोहरा, सांड नदी, सूर नदी हे सर्व एकमेकांना जोडण्याचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. पेंच बांधून 40 वर्षाचा कालावधी झाला पण देखभाल होऊ शकली नाही. काटोल नरखेडसाठी एक ग्रीड तयार करण्याचे काम करण्याचे निर्देशही देण्यात आले. छोटे छोटे गॅबियन बंधारे बांधून पावसाचे थेंबभर पाणी वाहून जाऊ नये अशी व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जलसंधारणाच्या कामासाठी वेगळे बजेट आपण आणणार आहोत. पण कामाच्या दर्जात कोणतीही गडबड झाली तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रकरण देण्याचा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जलसंधारण या दोन गोष्टींना यापुढे अधिक प्राधान्य देण्यात येईल असेही ते म्हणाले.
अप्पर आयुक्त सु. पा. कुशीरे यांनी प्रास्ताविक केले. विदर्भासाठी हे कार्यालय आवश्यक होते. यामुळे शेतकर्‍याच्या अडचणी सोडवल्या जाणार आहेत, असेही ते म्हणाले.