जिल्हा परिषदेची आढावा सभा
नागपूर: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेतलेल्या सर्व कामांचे कार्यादेश येत्या 10 पूर्वी द्या, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जि.प. प्रशासनाला दिले. तसेच सन 2018-19साठी डीपीसीने सर्व विभागांना वितरित केलेला निधी खर्च झाला असल्याची माहिती विभागप्रमुखांनी पालकमंत्र्यांना दिली.
जिल्हा परिषदेत आज सर्व विभाग प्रमुखांची आढावा सभा घेण्यात आली. या सभेला जि.प. सीईओ संजय यादव व विभाग प्रमुख उपस्थित होते. समाज कल्याण विभागाने 18-19 चा सर्व निधी खर्च केला असून 19-20 चे सर्व नियोजन झाले आहे. या कामांचे बी 1 निविदा काढून कामे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
आरोग्य विभागाने जुन्या 3 आणि नवीन 2 आरोग्य उपकेंद्राचे बांधाकम केले आहे. 10 कोटी रुपये डीपीसीने या विभागाला दिले होते. उपकेंद्र बांधकाम विस्तारीकरणासाठ़ी 3 कोटी देण्यात आले. जे उपकेंद्र मोडकळीस आले, त्या इमारतींची दुरुस्ती आधी करण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच यंत्रसामुग्रीसाठी हापकिन्सला दिलेले पैसे परत घ्या. त्या पैशातून रुग्णवाहिका घेण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. टंचाई विभागाला 20 कोटी रुपये नागरी सुविधासाठी दिले. पाणीपुरवठा विभागामार्फत मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनेचे सर्व कामाचे कार्यादेश देण्यात आले आहे. यासाठी प्राप्त झालेले 12 कोटी खर्च झाले. सिंचन विभागाला 2018-19 चा मिळालेला निधी पाझर तलाव दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आले.
बांधकाम विभागातर्फे रस्त्यांची कामे सुरु आहेत. 72 कामांपैकी 26 कामे शिल्लक ओहत. सर्व कामाचे कार्यादेश 10 सप्टेंबरपर्यंत देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच एकही रस्ता 3 मीटरचा करू नका. पावणे चार मीटरपेक्षा कमी रुंदीचा रस्ता करू नका असेही पालकमंत्री म्हणाले. पशुसंवर्धन, शिक्षण विभागाचा 2018-19 चा निधी खर्च करण्यात आला. महिला बाल कल्याण विभागाने 5 कोटी रुपये अंगणवाड्यांचे व शौचालयाच्या बांधकामावर खर्च केले. सन 2019-20 साठी 9 कोटी रुपये 143 नवीन अंगणवाड्यांच्या बांधकामवर खर्च केले जाणार आहेत.
कृषी विभागाला देण्यात आलेल्या 2018-19 चा सर्व निधी योजनांवर खर्च करण्यात आला. विषबाधा प्रतिबंधक मोहीम राबविण्यात आली. यामुळे एकही शेतकरी बाधेने दगावला नाही. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सर्वांना घरे 2022 योजनेअंतर्गत 10815 घरे पूर्ण केली आहेत. ज्यांची कच्ची घरे आहेत, त्यांना पक्की घरे देण्यात येणार आहेत. बी 1 निविदा बीडीओ स्तरावर काढून कामाचे कार्यादेश लवकरच देण्याच्या सूचना देण्यात आल्या.