Published On : Wed, May 15th, 2019

गाडी सुटण्याच्या भीतीने विना तिकीटच चढतात प्रवासी

जनरल तिकीट केंद्राची संख्या कमी

नागपूर: उन्हाळ्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. मात्र, त्यातुलनेत जनरल तिकीट केंद्राची संख्या कमी आहे. याचा फटका प्रवाशांना बसतो. तिकीट घेऊनच प्रवास करण्याची त्यांची ईच्छा असते. मात्र, गाडी सुटेल या भीतीने अनेक प्रवासी विना तिकीटच गाडीच चढतात. विना तिकीट असल्यामुळे त्यांच्याकडून दुप्पट चार्ज घेतला जातो. सकाळी ५ ते ८ वाजेदरम्यान अशी दररोजची स्थिती आहे.

नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम प्रवेशव्दाराकडे ७ जनरल तिकीट केंद्र आहेत. तर अजनी स्थानकावर केवळ दोन. सकाळच्या वेळी आमला पॅसेंजर, इतवारी गोंदिया पॅसेंजर, नागपूर – अमरावती पॅसेंजर, अजनी – काजीपेठ पॅसेंजर आणि नागपूर – भुसावळ पॅसेंजर असतात. त्यामुळे सकाळी ५ ते ८ यावेळात जनरल तिकीट केंद्रावर प्रचंड गर्दी होते. नेमका याच वेळात बहुतेक केंद्र बंद असतात. तिकीट देणारा एक आणि शेकडो प्रवासी असल्याने तिकीट घेण्यासाठी चांगलाच गोंधळ उडतो. रेल्वे तिकीट घेण्याची त्यांची इच्छा असतानाही गाडी सुटेल या भीतीने अनेक प्रवासी विनातिकीटच गाडीत चढतात. प्रवासादरम्यान तिकीट तपासणीसाकडून विनातिकीट घोषित केल्यानंतर तिकीटांच्या किंमतीपेक्षा अधिक पैसे त्यांना द्यावे लागतात. तर दुसरीकडे प्रशासनाकडे कर्मचाºयांची कमरता असल्याने विना तिकीट प्रवास करणाºया सर्वांवरच कारवाई शक्य होत नाही. या प्रकारामुळे रेल्वेचे राजस्व कमी होत आहे.

उन्हाळ्याच्या सुट्यात बहुतेकजण कुटुंबासह फिरायला जाण्याचा बेत आखतात. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढते. प्रवाशांची अतिरीक्त गर्दी लक्षात घेता नागपूर व अजनी रेल्वे स्थानकावर विशेष तिकीट केंद्राची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

सायंकाळच्या वेळीच बहुतेक गाड्या असल्याने तिकीट केंद्रावर प्रवाशांची गर्दी वाढते. सोमवारी नागपूर रेल्वे स्थानकाच्या तिकीट केंद्रावरील दोन खिडक्या बंद होत्या. त्यामुळे उर्वेरीत खिडक्यांवर प्रचंड गर्दी झाली होती.