Published On : Thu, Jul 18th, 2019

महिन्याभरातच वाजले रोडचे तीन तेरा

टाकळघाट:- खापरी (गांधी) व खापरी (मोरेश्वर) या जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या टोकावरील गावांना सध्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेद्वारा जोडण्याचे काम केले आहे.परंतु मलाई कमविण्याच्या नादात कंत्राटदाराणे केलेल्या बोगस कामामुळे अगदी महिन्याभरातच रस्त्याचे व पुलाचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येते.

खैरी (खुर्द) हे गाव नागपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून अनेक वर्षांपासून येथील जनतेणे रस्त्याच्या नावाने अनेकदा शासनाचे उंबरठे झिजवीत होती.परंतु मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत रस्ता बनल्याने काहीशी सुखवलेल्या जनतेचा निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.

देवळी (निस्ताने) ते खैरी (खुर्द) हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ६९ चे काम चार महिन्या पासून सुरू आहे.यात रस्त्यावरील पूल व रस्त्याचे खडीकरण केले आहे.या तयार झालेल्या रस्त्यावर बांधलेल्या पुलाचे प्लास्टर उखडले असल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ५१ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून या १ किमी रस्त्याचे काम शासनाने हे के के कन्स्ट्रकॅशन,नागपूर यांना दिले होते.राज्यशासनाने ग्रामीण विकास यंत्रणा कडून अर्थसहाय्य प्रकल्प मंजूर करून रस्त्याचे काम जेमतेम आटोपले परन्तु पहिल्याच पावसात रस्त्याचे पितळ उघडे पडले असून पुलाचे प्लास्टर उखडल्याने कामाचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे.कंत्राटदाराने पुलाचे कामात कुठले साहित्य वापरले कोण जाणे?संबंधित कामात कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्यात काही अर्थकारण झाले असावे अशी शंका उपस्थित होत आहे.

दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात जर अशी कामे होत असेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल असा प्रश्न निर्माण होत आहे.स्थानिक प्रशासनाला कुठलीही विचारपूस न करता पुलाची कामे केली असून काही ठिकाणी उंच भागात पुलाचे बांधकाम केल्याने पावसाचे पाणी सखल भागात साचले जाऊन रस्ता पुन्हा खराब होऊ होऊ शकतो.तसेच रस्त्याच्या बाजूला पाहिजे त्या प्रमाणात ड्रेनेज (नाल्या) खोदल्या नसल्याने पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्यास यास जवाबदार कोण?अशी चिंता येथील शेतकरी नंदू करनाके,त्रेम्बक इवनाते,हिरालाल करनाके,प्रफुल तुमडाम यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे लखमापूर ते कीन्ही या रस्त्याचे काम सुद्धा के के कन्स्ट्रक्शन कंपणीच करत असून या कामात सुद्धा कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंता ठाकरे यांचे आदेश डालवून पुलाचे कामात रेती ऐवजी डस्ट चा वापर केला होता.तर या कामातही कंत्राटदाराने डस्टच वापरला असावा म्हणूनच अवघ्या दोन चार महिन्यात पुलाचे प्लास्टर उखडले असावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन याना अंधारात ठेवून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी रस्त्याच्या कामे करतात त्यामुळे रस्त्याच्या कामावर कोनाची देखरेख नसल्याने हा सगळा सावळा गोंधळ चालू आहे.प्रशांत पी पाटील सरपंच गट ग्रामपंचायत खापरी (गांधी )