Published On : Tue, Aug 25th, 2020

टाकावू प्लास्टीक संकलनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा

Advertisement

नागपूर – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात गणरायाचे आगमन झाले आहे. त्यामुळे या वर्षीचा गणेश उत्सव नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरणपूरक साजरा व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात गणपती उत्सवाचा प्रारंभच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टीक कचऱ्याचे संकलन करून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला. दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमात पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 561 ग्रामपंचायतींमध्ये श्रमदान करून सुमारे 2 टन प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

कोरोनासोबतच इतर आजारावर मात करायची असेल तर आपल्याला स्वच्छतेची कास धरणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत जिल्ह्यात स्वच्छतेच्या शाश्वत कामांसोबतच घनकचऱ्याचे व्यवस्थापन होणे अपेक्षित आहे. यात सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचे असून त्याचे संकलन करून पूर्णचक्रीकरण करणे काळाची गरज आहे .हा विचार ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्यासाठी गणेशोत्सव हे प्रभावी व्यासपीठ आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2020 अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात पोषण आहार सप्ताह, रक्तदान शिबीर, कोविड-19 बाबत जनजागृती आणि तपासणी, नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्ती कार्यक्रम इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही जिल्ह्यातील बहुतेक सर्वच ग्रामपंचायतींमध्ये उत्स्फूर्तपणे श्रमदानातून प्लास्टीक संकलन करण्यात आले. यात ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ व महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला .

Advertisement
Advertisement

श्रमदानातून ‘प्लास्टीक संकलन’ या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या विभाग प्रमुखांनी त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये जाऊन श्रमदान केल्यामुळे ग्रामस्थांना प्रोत्साहन मिळाले. श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथ, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले. तर नरखेड पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत खापरी केणी येथे संकलित होत असलेल्या प्लास्टिक कचऱ्यातून ‘बंधाऱ्यांची उभारणी’ करण्यात येत आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल किटे, गट विकास अधिकारी प्रशांत मोहोड यांनी स्वतः श्रमदान करून या स्तुत्य उपक्रमाला प्रोत्साहन दिले.

जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट संसाधन केंद्राचे सदस्य तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, जिल्हा पाणी स्वच्छता मिशनचे सर्व सल्लागार यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विशेष योगदान दिले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement