Published On : Mon, Aug 5th, 2019

‘इनोव्हेशन पर्व’ विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना पंख देणारे : महापौर नंदा जिचकार

Advertisement

स्वयंसेवकांच्या बैठकीत मार्गदर्शन : प्राध्यापक, विद्यार्थ्यांनीही मांडल्या सूचना

नागपूर,: नागपूर महानगरपालिकेतर्फे यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या ‘मेयर इनोव्हेशन अवॉर्ड’ आणि हॅकॉथॉनची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. याच उपक्रमाचा दुसरा भाग म्हणजे २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे आयोजित ‘इनोव्हेशन पर्व’च्या रूपाने साजरा करण्यात येणार आहे. ‘इनोव्हेशन पर्व’ म्हणजे विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना पंख देणारे, त्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांना उद्योगाच्या रूपात परिवर्तीत करणारे आणि त्यांना शासकीय पातळीवर बळ देणारे ठरेल, या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी ‘इनोव्हेशन पर्व’चा उल्लेख केला.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात सोमवारी (ता. ५) इनोव्हेशन पर्व आयोजनाच्या निमित्ताने स्वयंसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. बैठकीला महापौर नंदा जिचकार यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, नगरसेविका रूपा रॉय, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे मुख्य कन्वेनर डॉ. प्रशांत कडू, इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) ए.एस. मानकर, प्राचार्य डॉ. राजेश गादेवार, प्रा. श्रीमती अग्रवाल, प्रा. रवींद्र जोगी यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.

‘इनोव्हेशन पर्व’बद्दल बोलताना महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दूरदृष्टीमुळे नागपूर शाश्वत विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकत आहे. नागपूर शहरात विकासाच्या संधी आजही उपलब्ध आहेत. या नेत्यांमुळे या शहराचा शाश्वत विकास होतो आहे. विद्यार्थी आणि नागरिकांमध्येही शहर विकासाच्या दृष्टीने अनेक चांगल्या संकल्पना आहेत. समस्यावर उपाय त्यांच्याकडे आहेत. मागल्या वर्षी मेयर इनोव्हेशन अवॉर्डच्या निमित्ताने केवळ महानगरपालिकेशी संबंधित २७ समस्यांवर विद्यार्थी व नागरिकांकडून उपाय मागविण्यात आले होते.यावेळी शासनाच्या विविध विभागाशी संबंधित ९९ समस्या, प्रश्नांवर उपाय मागविण्यात आले आहेत.

या उपायांचे, प्रकल्पांचे सादरीकरण २३ऑगस्ट रोजी हॅकॉथॉनच्या माध्यमातून करण्यात येईल. चांगल्या कल्पनांना उद्योगाच्या रूपात कसे परिवर्तीत करता येईल यासाठी २४ ऑगस्ट रोजीच्या ‘स्टार्ट अप फेस्ट’च्या माध्यमातून व्यासपीठ देण्यात येईल. तर याच कल्पनांना शासकीय पातळीवर पोहचविण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी आयोजित ‘द ॲसिलरेट’च्या माध्यमातून बळ देण्यात येईल. संपूर्ण देशात अशा प्रकारचे हे पहिले आयोजन असून या आयोजनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले. मेयर इनोव्हेशन अवॉर्डमध्ये निवड करण्यात आलेल्या प्रकल्पाची निवड बँकाक येथे होणाऱ्या उपक्रमासाठी झाल्याचा गौरवोल्लेखही त्यांनी यावेळी केला.

मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे मुख्य कन्वेनर डॉ. प्रशांत कडू यांनी इनोव्हेशन पर्व आयोजनाबद्दल माहिती सांगितली. जी-कॉमच्या बैठकीत मेयर इनोव्हेशन अवॉर्डची घेण्यात आलेली दखल आणि यापुढे जगातील महत्त्वाच्या शहरात हा उपक्रम राबविण्यासंदर्भात झालेला निर्णय याबाबत त्यांनी सविस्तर सांगितले. इनोव्हेशन पर्वचे मुख्य संयोजक केतन मोहितकर यांनी आयोजनाच्या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थी स्वयंसेवकांचे काय महत्त्व राहील, त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल, याबाबत विस्तृत माहिती दिली. यानंतर उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी काही सूचना मांडल्या. आयोजनात अभियांत्रिकी महाविद्यालयासोबतच अन्य पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने कुलगुरुंच्या माध्यमातून पत्र पाठविण्याचीही सूचना प्राध्यापकांनी केली.

नोंदणीसाठी वेबसाईट सुरू
‘इनोव्हेशन पर्व’मध्ये सहभागी होण्यासाठी कुठल्या-कुठल्या विषयांवर प्रकल्प सादर करण्यात येईल, उपक्रमात कसे सहभागी होता येईल, त्याची नोंदणी कशी करावी, याची संपूर्ण माहिती देणारी innovationparv.inही वेबसाईट मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींची ‘स्वयंसेवक नोंदणी’सुद्धा या वेबसाईटवर करता येणार आहे.