Published On : Mon, Aug 5th, 2019

‘रमाई’ योजनेतील रखडलेले प्रस्ताव तात्काळ मार्गी लावा : सभापती तारा यादव

गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीची बैठक : केंद्रीय स्तरावर धनादेश वितरणाचे आदेश

नागपूर: रमाई घरकुल योजना ही गरीबांसाठीची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी सादर केलेले प्रस्ताव दोन-दोन वर्षांपासून रखडलेले आहेत. ते का रखडले याची कारणे शोधून सर्व प्रकरणे तात्काळ मार्गी लावा आणि पुढील काही दिवसांत लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करा, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी दिले.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीची बैठक पार पडली. सदर बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला समितीच्या उपसभापती उषा पॅलट, सदस्य अनिल गेंडरे, रुतिका मसराम, विशेष आमंत्रित नगरसेवक सुनील हिरणवार, उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेश राहाटे, कार्यकारी अभियंता (पंतप्रधान आवास योजना) गिरीश वासनिक, उपअभियंता आर. जी. खोत, हेडाऊ, अभियंता कमलेश चव्हाण, प्रमोद रंगारी, अजय पाझारे, सहायक अभियंता सुनील गजभिये यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना सभापती तारा यादव म्हणाल्या, समाजातील गरीब आणि गरजू लोकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. प्रत्येकाला आपले हक्काचे घर असावे असे वाटते. त्यानुसार, शासनाने रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना, मालकी हक्काचे पट्टे वाटप अशा विविध योजना आणल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून लाभ मिळावा यासाठी अनेकांनी अपेक्षेने नियमानुसार अर्ज केले आहेत. मात्र, अर्ज करूनही लाभार्थ्यांना अद्यापही योजनांचा लाभ मिळाला नसल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्याचे त्यांनी सांगितले. रमाई आवास योजनेतील रखडलेल्या सर्व प्रकरणातील त्रुट्या तातडीने दूर करून धनादेश वाटपाचा मार्ग मोकळा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. धनादेश हे झोनस्तरावर न करता मुख्यालयात पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित क्रमानुसार धनादेश वाटप करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ज्यांनी अर्ज सादर केले आहेत, त्यांना किमान अर्जाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यात यावी. पुढील महिन्यात निवडणूक आचारसंहिता लागत असल्याकारणाने मालकी हक्क पट्टे वाटपाच्या कार्यवाहीला वेग देण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

समितीचे सदस्य अनिल गेंडरे, उषा पॅलट, रुतिका मसराम यांनीही यावेळी काही सूचना केल्या. योजनासंदर्भातील सद्यस्थितीची माहिती असणारा प्रभागनिहाय अहवाल सर्व सदस्यांना उपलब्ध करून देण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.

तत्पूर्वी कार्यकारी अभियंता राजेश राहाटे यांनी रमाई आवास योजनेची तर कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक यांनी पंतप्रधान आवास योजनेची माहिती सभापती व सदस्यांना दिली. बैठकीला सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.