Published On : Thu, Jun 7th, 2018

आम्हालाही नक्षलवादाशी जोडणार का? – कोळसे पाटील

नगर : ‘पुण्यात आयोजित करण्यात आलेली एल्गार परिषद मी आणि माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी आयोजित केली होती. याचा नक्षलवाद्यांशी सुतराम संबंध नाही. पोलिस तसा दावा करीत असतील, तर आम्हालाही नक्षलवादाशी जोडले जाणार का,’ असा सवाल माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला.

यातून कोळसे पाटील यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एक जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांच्यासह काही जणांना अटक केली आहे, हर उल्लेखनीय.

नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना कोळसे पाटील म्हणाले, ‘ही परिषद मी आणि न्यायमूर्ती सावंत यांनी कबीर कलामंचच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आयोजित केली होती. त्याचा ना कोरेगाव भीमा प्रकरणाशी संबंध आहे, ना नक्षलवाद्यांशी. आम्हाला नक्षलवादाचा ‘न’सुद्धा माहिती नाही. तरीही पोलिस तसा दावा करीत असतील, तर मग आम्ही नक्षलवादी ठरू.

या एल्गार परिषदेच्या माध्यमातून आम्ही भाजपाविरोधी वातावरण तयार करीत आहोत. ही अप्रत्यक्ष आणीबाणी आणि हुकूमशाही आहे. कोरेगाव भीमाप्रकरणी सुधीर ढवळे आणि अन्य कार्यकर्त्यांची अटक अन्यायकारक आहे.’