Published On : Thu, Jun 7th, 2018

शहाच्या भेटीनंतर सामानाची भाषा बदलली

मुंबई : २०१४ पासून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सहभागी असूनही भाजपावर सतत टीका करताना शिवसेना दिसत होती. पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून दररोज कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर डिवचण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुख करत होते. मात्र भाजपाध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या कालच्या भेटीनंतर आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाजपावर टीका करण्याचे टाळण्यात आले आहे.

अमित शहा यांच्या भेटीपर्यंत सामनातून सुरु असलेलं टीकास्त्र कालच्या भेटीनंतर मात्र बोथट झालेलं दिसतंय. रिझर्व्ह बँकेनं वाढवलेल्या रेपो रेटच्या दरावर हा अग्रलेख असून सरकारवर टीका करणं कटाक्षानं टाळण्यात आल्याचंआज अग्रलेखात दिसून आले आहे.

आपल्या अर्थव्यवस्थेचे तारू मार्गी लागत आहे असे एक ‘चित्र’ सध्या निर्माण झाले आहे. कदाचित त्यामुळेही रिझर्व्ह बँकेने रेपो आणि रिव्हर्स रेपो या दोन्ही दरात वाढ करण्याचे धाडस दाखवले असावे. आता यामुळे रिझर्व्ह बँकेसह इतर बँकिंग क्षेत्राला आणि अर्थव्यवस्थेला त्याचा किती फायदा होणार वगैरे गोष्टी भविष्यात स्पष्ट होतील, पण तूर्त रेपो दराच्या पाव टक्क्याच्या दणक्याने सर्वसामान्य माणसाच्याच खिशात हात घातला जाणार आहे. इंधन दरवाढ कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यात कर्जाचा ईएमआयदेखील वाढणार आहे. म्हणजे आधीच महागाईचा भडका, त्यात पाव टक्क्याचा तडका अशा कात्रीत सामान्य माणूस सापडणार आहे. असे आजच्या अग्रलेखात म्हटल्या गेले आहे.