मुंबई: महाराष्ट्रात उद्योग वाढीसाठी अंत्यत पोषक वातावरण असल्याचा अहवाल इंडो-फेंच चेंबर ऑफ कार्मसने सादर केला आहे. शासनाच्या विविध धोरणामुळे हे शक्य झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान,उद्योगांत अधिक सुलभता आणण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.
आज येथे इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई याच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचे आय़ोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योग क्षेत्रातील विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली.
इंडो-फ्रेंच चेंबरने केलेल्या ऑनलाईन पाहणीत 62 टक्के उद्योजकांनी महाराष्ट्रात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण असल्याचे यावेळी नमूद केले आहे. मूलभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आदीबाबींमुळे देश-विदेशातील गुंतवणूकदार महाराष्ट्राला प्राधान्य देत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना श्री. देसाई यांनी सांगितले,महाराष्ट्रातील उद्योग वाढीत फ्रान्सचा मोठा वाटा आहे. सध्या सहाशे फ्रेंच कंपन्या देशात कार्यरत असून त्यामधून सहा हजाराहून अधिक कामगारांना रोजगार मिळालेला आहे. परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध धोरणे राबवित आहे. महाराष्ट्र शासनाने उद्योग सुलभतेसाठी मैत्री नावाचे व्यासपीठ तयार केले असून त्याद्वारे एका छताखाली सर्व समस्या सोडवल्या जात आहेत. मैत्री अधिक सुलभ करण्यावर पुढील काळात भर दिला जाईल. असे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
इंडो फ्रेंच कॉमर्सच्या विविध कंपन्यांचे सुमारे तीस प्रतिनिधींनी वीज, दळणवळण जीएसटीसंबंधी काही सूचना केल्या. त्या चर्चेद्वारे सोडवण्याची ग्वाही उद्योगमंत्र्यांनी संबंधितांना दिली.
मुंबईतील फ्रान्सच्या वाणिज्यदूत सोनिया बार्बरी तसेच इंडो चेंबर ऑफ फ्रान्सचे संचालक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
