Published On : Fri, Jul 26th, 2019

खापरी परिसरात नवीन वीज वाहिनी टाकणार महावितरणचे संवाद मेळावे

Advertisement

नागपूर: खापरी परिसरात नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करण्याऱ्या वीज ग्राहकांना वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडून या भागात अडीच किलोमीटर लांबीची नवीन लघुदाब वाहिनी टाकण्यात येणार आहे.

महावितरणकडून सुरु असलेल्या संवाद मेळाव्यात वरील बाब अर्जदार वीज ग्राहकांनी निदर्शनास आणून दिली. महावितरणच्या बुटीबोरी विभागातील खापरी शाखा कार्यालयात आयोजित वीज ग्राहकांच्या विविध तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. खापरी शाखा कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वेळाहरी, रुई, जामठा, शंकरपूर, वडोदा या परिसरात नागरी वस्ती वाढू लागल्याने नवीन घरगुती वीज जोडणीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज महावितरण कार्यालयात जमा होऊ लागले होते.

अर्ज प्रलंबित असल्याने वीज जोडण्या रखडल्याची बाब वीज संवाद मेळाव्यात समोर आली. महावितरणकडून यावर तात्काळी कारवाई करण्यात आली. महावितरणच्या बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ यांनी बुटीबोरी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील फडणवीस, बुटीबोरी शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता निलेश आष्टणकर यांना या भागात जाऊन सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देष दिले. यानुसार अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील फडणवीस, बुटीबोरी शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता निलेश आष्टणकर यांनी सर्वेक्षण करून अडीच किलोमीटर लांबीची वीज वाहिनी टाकण्यासाठी आवश्यक असलेले अंदाज पत्रक वरिष्ठ कार्यालयास सादर केले. याला मान्यता मिळाल्यावर या परिसरात वीज वाहिनी टाकण्यात येणार आहे.

हिंगणा तालुक्यातील रायपूर, हुडकेश्वर उपविभागातील बेला शाखा कार्यालय ,पारशिवनी उपविभागातील तामसवाडी, नरखेड उपविभागातील मोवाड शाखा कार्यालय, कोंढाळी उपविभागातील बाजारगाव येथे महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी संवाद मेळावे घेण्यात आले. वाकी येथे आयोजित मेळाव्यात कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे, खापा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गजानन डाबरे, वकीच्या सरपंच श्रीमती डहाके उपस्थित होते.

महावितरणच्या हुडकेश्वर उपविभागातील वाडी येथे दिनांक ३० आणि ३१ जुलै रोजी तर दिनांक २९ जुलै रोजी नागपूर (पश्चिम) येथे वीज ग्राहकांसाठी तक्रार निवारण शिबिराचे योजना करण्यात आले आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत वीज ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारल्या जातील, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांनी दिली.