Published On : Tue, Mar 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्यातून १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Advertisement

मुंबई : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत मोठी घोषणा केली आहे. राज्यभरातून १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करून जनजागृती मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा महिला विरोधी चेहरा उघड करणार आहोत. महिलांचे मोठ्या प्रमाणात संघटन करून लोकशाहीत जनमताचा दबाव निर्माण करू. महिलांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Gold Rate
Apr 30- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,49,400 /-
Gold 22 KT ₹ 1,38,900 /-
Silver/Kg ₹ 2,38,200/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “गृहमंत्र्यांनी बदल सुचवले तरी विरोधकांनी पाठिंबा दिला नाही. उलट भाजपावर आरोप केले,” असे ते म्हणाले.

तसेच राजस्थान, गुजरात आणि दिल्लीसारख्या राज्यांत भाजपाने महिलांना मुख्यमंत्रीपद दिल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. “या पक्षांनी कधीही महिलांना नेतृत्वाची संधी दिली नाही,” असा आरोप त्यांनी केला.

प्रियंका गांधी यांच्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, “त्या नवीन आहेत, त्यामुळे काही बाबी त्यांना समजावून सांगितल्या नसतील.” महिला आरक्षण विधेयक २०२९ पर्यंत लागू होईल आणि महिलाच सर्वांना योग्य धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावरही त्यांनी काँग्रेसवर टीका केली. “मोदी सरकारने जात जनगणना मान्य केली आहे. पण १९७० नंतर ओबीसी जनगणनेबाबत काहीच केले गेले नाही,” असे ते म्हणाले.

यावेळी राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. “खोटे बोलण्याची स्पर्धा झाली तर सर्व सुवर्णपदके राहुल गांधींनाच मिळतील,” असा टोला त्यांनी लगावला.

महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, “त्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम विरोधक करत आहेत.” महिला आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विधेयकावर विरोधकांनी घेतलेली भूमिका ही महिलाविरोधी मानसिकतेचे उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement