Published On : Mon, May 21st, 2018

तंटामुक्त गाव मोहिम पत्रकार पुरस्कारासाठी 15 जून पर्यंत प्रवेशिका स्वीकारणार

Advertisement

नागपूर: महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत वृत्तपत्राच्या माध्यमातून ठळकपणे प्रसिध्दी देणाऱ्या पत्रकारांसाठी तंटामुक्त गाव मोहिम पत्रकार पुरस्कारासाठी दिनांक 15 जून 2018 पर्यंत वर्षभरात प्रसिध्द झालेल्या बातम्या, लेख, विशेष लेख आदी विशेष सहभागासंदर्भातील प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत पत्रकारांसाठी जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर पुरस्कार देवून गौरव करण्यात येते. या पुरस्कारासाठी 2 मे 2017 ते 1 मे 2018 या कालावधीत तंटामुक्त गाव मोहिमेसंदर्भात केलेल्या उल्लेखनिय लिखानासह योगदानासंदर्भातील प्रवेशिका तीन प्रतीत सादर करावयाचे आहे. जिल्हास्तरावर प्रथम- 25 हजार, द्वितीय- 15 हजार, तृतीय- 10 हजार. विभागीय स्तरावर प्रथम- 1 लक्ष, द्वितीय- 75 हजार, तृतीय- 50 हजार रुपयांचा पुरस्कार तर राज्यस्तरावर प्रथम- 2 लक्ष 50 हजार, द्वितीय- 1 लक्ष 15 हजार व तृतीय- 1 लक्ष रुपयांच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते.

पुरस्कारासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक निकष मिळून 100 गुण आहेत. संख्यात्मक तपशिलात बातम्या, वृत्तांकन, फोटो फिचर्स, लेख, अग्रलेख यांची संख्या यासाठी 40 गुण आहेत. साहित्य व अ वर्गवारीतील दैनिकात प्रसिध्द झाले असेल तर त्याला मिळालेल्या एकूण गुणांच्या 10 टक्के व ब वर्गवारीतील दैनिकास 5 टक्के ज्यादा गुण देण्यात येतात. पत्रकारांनी प्रवेशिका संपादकाच्या शिफारसीने पाठविणे आवश्यक आहे. प्रवेशिका पाठविताना विहित नमुन्यात सादर करायच्या असून हा नमुना जिल्हा माहिती कार्यालयात प्रशासकीय भवन क्रमांक-1 येथे उपलब्ध आहे.

प्रवेशिका पाठवितांना बातम्या, लेख हे 2 मे 2017 ते 1 मे 2018 या कालावधीत प्रकाशित झालेले असावेत. प्रवेशिका तीन प्रतीत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत क्रमांक 1, तिसरा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे 15 जून 2018 पर्यंत पाठवाव्यात. असे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी कळविले आहे.