
नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती वादातून ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डान्स क्लासला जाण्यासाठी स्वयंपाक करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर आणि पोटावर मारहाण केल्याचा आरोप आहे. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतर मानकापूर पोलिसांनी पतीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना झिंगाबाई टाकळी येथील साईनगर परिसरातील गोविंद सिटी येथे घडली. मृत महिलेचे नाव यामिनी कृष्ण लाल यादव (३८) असून आरोपी पतीचे नाव कृष्ण लाल यादव (४१) आहे. या दाम्पत्याला दोन मुले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी कृष्ण लाल कामावरून घरी परतला. त्याने पत्नीला स्वतःसह मुलांसाठी जेवण तयार करण्यास सांगितले. मात्र, यामिनी सोसायटीमध्ये सुरू असलेल्या डान्स क्लासला जाण्याच्या तयारीत होती. त्यामुळे तिने स्वयंपाक करण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही मुलांसमोर कृष्ण लालने यामिनीच्या गळ्यावर आणि पोटावर हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. यामिनीनेही पतीसोबत झटापट केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. घटनेच्या वेळी कृष्ण लाल मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहितीही समोर आली आहे.
मारहाणीनंतर यामिनीने गळा आणि पोट दुखत असल्याचे सांगत पतीला वेदनाशामक औषध आणण्यास सांगितले. कृष्ण लाल औषध घेण्यासाठी मेडिकलवर गेला; मात्र दुकान बंद असल्याने तो औषध न घेताच घरी परतला.
दरम्यान, यामिनीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. पोटाला झालेल्या अंतर्गत दुखापतीमुळे तिच्या आतड्याला गंभीर इजा झाली आणि आतडे फुटल्याने पोट फुगू लागले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर कृष्ण लालने तिला मानकापूर येथील मॅक्स रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान यामिनीचा मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवला. मात्र शवविच्छेदन अहवालात यामिनीच्या गळ्याचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे, तसेच पोटातील आतड्याला गंभीर दुखापत होऊन ते फुटल्याचे समोर आले.
शवविच्छेदन अहवालामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांनी कृष्ण लालला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीनंतर कथित मारहाणीच्या आधारे मानकापूर पोलिसांनी कृष्ण लाल यादव याला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला. मामुली घरगुती वादाचा थेट मृत्यूपर्यंत प्रवास झाल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही मारहाण दोन मुलांसमोर झाल्याने या घटनेने परिसरातील नागरिकांनाही हादरवून सोडले आहे.




