नागपूर : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत अधिसूचना जारी केली असून, मल्टीलेअर ध्वनिव्यवस्था, प्लाझ्मा आणि प्रेशर मिड श्रेणीतील ध्वनिव्यवस्थेवर बंदी घालण्यात आली आहे.
कलम १६३ अंतर्गत जास्तीत जास्त ६० दिवसांपर्यंत अधिसूचना लागू करता येते. आगामी काळातील विविध सण आणि उत्सव लक्षात घेऊन ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पुढील ६० दिवस या ध्वनिव्यवस्थांविरोधात कारवाई केली जाणार असून, आवश्यकतेनुसार अधिसूचनेचे नूतनीकरणही करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
या अधिसूचनेत मल्टीलेअर डीजे, लेझर लाईट आणि बीम लाईटचाही समावेश आहे. मल्टीलेअर ध्वनिव्यवस्थेत बेस, मीडियम आणि टॉप अशा तीन पातळ्या असतात. विशेषतः बेसमधून निर्माण होणाऱ्या तीव्र कंपनांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, कायदेशीर ध्वनिमर्यादेत वाजवण्यात येणाऱ्या ध्वनिव्यवस्थेवर कोणतीही बंदी नाही. तसेच सण-उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्ये वाजवणे आणि संगीतावरही प्रतिबंध घालण्यात आलेला नाही. निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मल्टीलेअर ध्वनिव्यवस्था, प्लाझ्मा आणि प्रेशर मिडविरोधातच कारवाई केली जाणार आहे.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नागरिकांना सण-उत्सव उत्साहात साजरे करण्याचे आवाहन करताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे स्पष्ट केले आहे.थोडक्यात, उत्सवांवर बंदी नाही; मात्र कानठळ्या बसवणाऱ्या आवाजावर पोलिसांचा वॉच राहणार आहे.





