
नागपूर : संविधान दिनाच्या निमित्ताने नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान बचाओ’ रॅलीत सहभागी झालेले अभिनेते प्रकाश राज यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. नागपुरात दाखल झाल्यानंतर विमानतळावर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
देशात सरकारविरोधात बोलणारे तरुण, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, आवाज दाबण्याचा प्रयत्न जितका अधिक होईल, तितक्याच ताकदीने नवे आवाज उमटतील, असा इशाराही त्यांनी दिला.
‘तरुणांच्या आवाजाची एवढी भीती का?’ असा सवाल उपस्थित करत प्रकाश राज यांनी लोकशाहीत प्रश्न विचारणे आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी सौरभ दास यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून बजावण्यात आलेली नोटीस, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कथित सेन्सॉरशिप आणि शांततापूर्ण आंदोलनांना रोखण्यासाठी पीस बॉण्डचा वापर होत असल्याच्या मुद्द्यांवर भाष्य केले. सरकारवर टीका करणाऱ्या आवाजांवर निर्बंध आणण्याऐवजी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजचा तरुण केवळ राजकीय विषयांवर नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि भविष्याच्या प्रश्नांवर बोलत आहे. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही, असा सूरही त्यांच्या भाषणातून उमटला.
संविधानाने प्रत्येक नागरिकाला विचार मांडण्याचा, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण झाले पाहिजे, हा महत्त्वपूर्ण संदेश प्रकाश राज यांनी नागपुरातील संविधान बचाओ रॅलीतून दिला.



