
मुंबई : पुण्यातील मंदार किवळे हल्ला प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्रिपद स्वीकारावे, अशी मागणी केली. त्यावर आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार या दिवंगत अजित पवार यांच्याप्रमाणे काम करत नसल्याचे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी रोहित पवार यांना सुनावले की, सुनेत्रा पवार यांच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही. त्यांनी राज्यातील संस्कार आणि राजकीय संस्कृतीचे भान ठेवावे. रोहित पवार यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला असल्याची टीकाही त्यांनी केली.
सुनेत्रा पवार या अनुभवी, संस्कारशील आणि प्रशासनाची जाण असलेल्या नेत्या आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी सरकार आणि पक्षात आपली भूमिका सक्षमपणे बजावली आहे. त्यांना प्रशासन चालवता येत नाही किंवा पालकमंत्रिपद सांभाळता येत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, सुनेत्रा पवार यांचा राजकारणातील सक्रिय सहभाग तुलनेने अलीकडचा असला, तरी कमी कालावधीत त्यांनी प्रशासनावर चांगली पकड निर्माण केली आहे. अनेक वर्षे राजकारणात काम करूनही काही नेत्यांना प्रशासनावर प्रभाव निर्माण करता येत नाही. मात्र, सुनेत्रा पवार यांनी कमी वेळेत आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. त्यांच्या कामावर टीका करून रोहित पवार यांनी स्वतःची राजकीय पत कमी केली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
फडणवीसांच्या पालकमंत्रिपदावरूनही राजकीय संघर्ष-
दरम्यान, पुण्यात मंदार किवळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्रिपद स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी केली. मात्र, फडणवीस पुण्याचे पालकमंत्री झाल्यास जिल्ह्याचे वाटोळे होईल, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती.
या विधानावरही बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रोहित पवार पिसाळल्यासारखे वागत असून, राजकारणासाठी प्रत्येक विषयावर टीका करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. सुप्रिया सुळे यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवतात, मात्र रोहित पवार यांनी अशा प्रकारची विधाने करणे टाळावे, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्रिपद स्वीकारणार नसल्याचे सांगतानाच सुनेत्रा पवार या सक्षमपणे जबाबदारी सांभाळू शकतात, असे बावनकुळे यांनी नमूद केले.
मंदार किवळे हल्ला प्रकरणावरून सुरू झालेला वाद आता पुण्याच्या पालकमंत्रिपदासह सुनेत्रा पवार यांच्या कार्यक्षमतेपर्यंत पोहोचला आहे. रोहित पवार यांच्या विधानांवर बावनकुळे यांनी केलेल्या आक्रमक टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.



