Published On : Thu, Nov 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा; राज्य ‘पांडू हवालदार’ चालवत असल्याची हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

Advertisement

महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा; राज्य ‘पांडू हवालदार’ चालवत असल्याची हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

ठाणे : महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळावा, ही काँग्रेसची सातत्याने मागणी असून, गृहमंत्रीपदाचा पूर्णवेळ कारभार नसल्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या महाराष्ट्र ‘पांडू हवालदार’ चालवत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

पुण्याचे रूपांतर ‘कोयता नगरी’ करण्यात आले असून, राज्याचे गृहमंत्री अकार्यक्षम असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही. राज्यात कायद्याचे अस्तित्व उरले नसून, चोर आणि गुंडांचे पोलिसांशी संगनमत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. राज्यात ‘चोर-पोलिस भाई’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे सांगताना त्यांनी अजित पवार यांचाही उल्लेख केला. अजितदादा खमके नेते होते, मात्र त्यांच्या काळातही कोयता गँग अस्तित्वात होती, असे सपकाळ म्हणाले.

दरम्यान, पाटण प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश देऊनही काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. कुंभमेळ्याच्या कामांमध्येही भ्रष्टाचार सुरू असल्याची टीका करत ‘पन्नास खोके, एकदम ओके’ अशा घोषणा ऐकायला मिळत असल्याचे ते म्हणाले. भाजप आणि फडणवीस सरकारच्या काळात चुकीच्या गोष्टी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Advertisement

भाजपच्या रॅलीवर टीका करताना संविधानाची पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. संविधानाबाबत आक्षेपार्ह भूमिका घेणाऱ्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

डिलिमिटेशन विधेयकाला काँग्रेसचा विरोध असल्याचे स्पष्ट करत या विधेयकाच्या माध्यमातून जातीयवादाला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ठाण्यात संविधानिक सरकार असतानाही खुनासारख्या घटना घडत आहेत. अशा घटनांचा निषेध करण्यासाठी काँग्रेस ठाण्यातून रॅली काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाचे संविधान मनुस्मृतीवर आधारित असावे, अशी भूमिका भाजपकडून पूर्वी मांडली जात होती, असा आरोप करत सपकाळ यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. लोकशाही मूल्ये आणि संविधानाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.