नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील प्रेमातून कोणी जाहिरात दिली, तर त्यामुळं रोहित पवारांना एवढा त्रास का होतो? असा सवाल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेयांनी केला. सोमवारी (९ सप्टेंबर) नागपूरजवळील कोराडी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अलीकडेच काही वृत्तपत्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी नतमस्तक होत असलेले फडणवीस यांचा फोटो असलेली जाहिरात प्रसिद्ध झाली. या जाहिरातीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर, विशेषतः बावनकुले यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना बावनकुळे यांनी रोहित पवारांवर पलटवार केला.
“उद्धव ठाकरे सरकारच्या काळात कोणत्या जाहिराती आल्या होत्या? कोणत्या धनाढ्यांनी त्या दिल्या होत्या? कशी वसूली केली जात होती? हे रोहित पवारांनी एकदा पाहावं. प्रेमापोटी फडणवीसांच्या फोटोसह जाहिरात आली, तर त्यांना का त्रास होतो? महाराष्ट्राला फडणवीसांच्या रूपाने एक दुर्मीळ सर्वांगीण नेता लाभला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे व अजित पवारांसोबत मिळून जनतेचं प्रेम जिंकलं आहे,” असं बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे पुढे म्हणाले, “या सरकारला ३ कोटी १७ लाख मतं मिळाली आहेत. त्यामुळे प्रेमातून जाहिरात आली, तर एवढं पोटदुखं का? छत्रपती शिवाजी महाराजांसमोर व राज्यातील १४ कोटी जनतेसमोर नतमस्तक असलेला फडणवीसांचा फोटो असलेली जाहिरात ही एका भावनेतून आली आहे. राज्य समर्पित आहे, हे दाखवण्यासाठी ती आहे. या भावनेचं राजकारण करू नका. आपण काय काय केलंय, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. पण त्यात जाण्याची मला गरज नाही. मात्र, फडणवीसांची जाहिरात आली म्हणून एवढं अस्वस्थ होणं चुकीचं आहे.”
“फडणवीसांनी इतकं जनप्रेम मिळवलं आहे की त्यांचे हजारो जाहिराती निघतील. ते महाराष्ट्राचे यशस्वी नेता आहेत. त्यामुळे लोक आपलं प्रेम जाहिरातींतून व्यक्त करत आहेत. संबंधित व्यक्तीनं नाव दिलं नाही, तरी त्यात विशेष काही नाही. भावना वेगळी नाही. म्हणून त्या भावनेचा आदर करायला हवा,” असंही बावनकुळे
यांनी स्पष्ट केलं.