नवी दिल्ली : पाकिस्तानसोबतचा तणाव कमी झाल्याने आणि देशांतर्गत घडामोडींना स्थैर्य लाभल्याने भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्याची प्रक्रिया पुन्हा गती घेत आहे. पक्षाचे विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपून काही काळ लोटला असून, नवीन अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा गुजरात दौरा लवकरच होणार आहे. याच दौऱ्यात किंवा त्यानंतर अध्यक्षपदासाठी नवे नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर आणि पाकिस्तानसोबतची युद्धविराम परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या घोषणेसाठी योग्य वेळ असल्याचे मानले जात आहे.
भाजपमध्ये नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेसाठी आतापर्यंत अनेक नावे चर्चेत होती. परंतु आता पक्षांतर्गत चर्चांनंतर दोन प्रमुख नावं शर्यतीत आघाडीवर आहेत – केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान.
या दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेषतः निवडणूक व्यवस्थापनात दोघांचाही हातखंडा मानला जातो. भूपेंद्र यादव यांनी अनेक राज्यांमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिले आहे, तर धर्मेंद्र प्रधान हे ओडिशामधील प्रभावी चेहरा असून ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
जातनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ओबीसी नेतृत्व पुढे आणण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता अधिक आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मे अखेरीस भाजपकडून अधिकृत घोषणादेखील होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नव्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती ठरवली जाणार आहे. सध्या मात्र यावर पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
राजकीय वर्तुळात मात्र, ‘भाजपच्या नवीन अध्यक्षाची घोषणा कधी होणार?’ याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.