
नागपूर: नागपूर महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया आता निर्णायक वळणावर आली आहे. सोमवार, २ फेब्रुवारी रोजी नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने, त्याआधीच भारतीय जनता पार्टीकडून दोन्ही पदांसाठी उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत केवळ महापौर व उपमहापौर पदच नव्हे, तर महानगरपालिकेतील स्थायी समिती व इतर विषय समित्यांच्या सभापती पदांवरही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
निवड प्रक्रियेला वेग-
भाजपाच्या सूत्रांनुसार, नामांकन प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वीच सर्व प्रमुख पदांसाठी उमेदवारांची नावे अंतिम केली जातील. त्यामुळे पक्षांतर्गत कोणताही गोंधळ टाळण्याचा प्रयत्न नेतृत्वाकडून केला जात आहे. बैठकीनंतर भाजपाचे अधिकृत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरिष्ठ नेतृत्वाची उपस्थिती-
या बैठकीसाठी भाजपाचे वरिष्ठ नेते, आमदार, संघटन पदाधिकारी तसेच नागपूरमधील प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. संघटनात्मक समतोल, प्रादेशिक प्रतिनिधित्व, अनुभव आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा सखोल विचार करून निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती आहे.
गडकरींचे नेतृत्व केंद्रस्थानी-
नागपूर शहर भाजपासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे नेतृत्व निवडीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याआधीही मनपा निवडणुकीतील रणनीती आणि जागावाटपात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.
भाजपाचा स्पष्ट बहुमताचा कौल-
नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने मोठे यश मिळवत सत्तेत पुनरागमन केले आहे. एकूण १५१ जागांपैकी १०२ जागांवर भाजपाने विजय मिळवला, तर काँग्रेसला ३४ जागांपुरते मर्यादित राहावे लागले.
इतर पक्षांची कामगिरी पुढीलप्रमाणे —
एआयएमआयएम – ६
मुस्लिम लीग – ४
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – २
बहुजन समाज पार्टी – १
आता आज होणाऱ्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, नागपूरचा पुढील महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.








