नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला एकेकाळी ग्रीन सिटीचा दर्जा मिळाला आहे. मात्र संत्रा नगरीला मिळालेला हा मान हळूहळू कमी होताना दिसत आहे.
एकीकडे स्थानिक प्रशासनाकडून वर्षानुवर्षे जुन्या झाडांची कत्तल केली जात आहे तर सामाजिकतेचा नावावर नवीन वृक्षारोपण केले जात आहे. प्रशासनाच्या या दोन तोंडी भूमिके मागचा नेमका हेतू काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
बिशप कॉटन स्कूलजवळील १०० वर्षाहूनही जुन्या वृक्षाची कत्तल –
सदर येथील बिशप कॉटन स्कूलजवळील कडुलिंबाचे १०० वर्षाहूनही जुन्या झाडाची नुकतीच कत्तल करण्यात आली. हरित कार्यकर्ते सचिन खोब्रागडे यांनी गुरुवारी नागपूर महानगरपालिकेच्या (एनएमसी) उद्यान विभागाकडे यासंदर्भात संताप व्यक्त करत तक्रार नोंदविली आहे.उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळले की हे झाड निवासी संकुलाच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर आहे आणि ते एक वारसा वृक्ष देखील आहे. तपासणीनंतर, उद्यान विभागाने लोटस कोर्टने झाड तोडण्यासाठी सादर केलेला अर्ज फेटाळला. खोब्रागडे यांनी आरोप केला की लोटस कोर्टचे अध्यक्ष आणि सचिव यांनी झाडाचे नुकसान केले आहे आणि त्यांनी कत्तल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र शहारातील जुन्या झाडांच्या अशा प्रकारच्या कत्तलीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
दुसरीकडे मनपाकडून नवीन वृक्ष लागवडीचे ढोंग –
सिव्हिल लाईन्समधील वॉकर्स स्ट्रीटच्या दोन्ही बाजूंना एनएमसीच्या गार्डन विभागातर्फे वृक्षरोपण करण्यात येत आहे.नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी या वृक्षारोपण मोहिमेचा आढावा घेतला. पोलिस जिमखाना आणि रामगिरी दरम्यानच्या १.५ किमी रस्त्यालगत ८,००० चौरस मीटर परिसरात ही वृक्षारोपण करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणांपुरतीच करण्यात येणारी ही वृक्षरोपण मोहीम संपूर्ण नागपुरात राबवणे गरजेचे आहे. सोबत मनपा आयुक्तांना शहातील जुन्या वृक्षांची सर्रास कत्तल होत असल्याचे दिसत नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
छत्रपतीचौकसह रिंग रोड परिसरातील शेकडो झाडांची कत्तल –
रिंग रोड परिसरातील शेकडो झाडांची अक्षरशः कत्तल केली आहे. दरम्यान कुठलीही परवानगी नसताना ही कत्तल करण्यात आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कापण्यात आलेल्या झाडांच्या प्रकरणात आता काही धक्कादायक शक्यता समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी आता पोलिसात तक्रार करण्यात आली असून अज्ञाता विरोधात वृक्षतोडीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
जाहिरातींचे होर्डिंग दिसावे म्हणून झाडांची कत्तल-
नागपूरच्या रिंग रोड हिंगणा टी-पॉइंटपासून कळमनापर्यंत अनेक किलोमीटरपर्यंत हा रस्ता पसरला आहे. मात्र, या रिंग रोडवरील त्रिमूर्तीनगर ते छत्रपती चौक दरम्यान सुमारे चार किलोमीटरच्या अंतरावरील दुभाजकावर चार चार फुटांच्या अंतरावर लावण्यात आलेल्या शेकडो झाडं गेल्या चार वर्षात चांगलेच वाढले आहेत. अनेक फुटांच्या उंचीच्या या हिरवळीमुळे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटच्या पोलवर लावण्यात येणाऱ्या वैध आणि अवैध होर्डिंग तसेच इतर फलक दोन्ही बाजूने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना स्पष्टपणे दिसत नव्हते. आणि त्यामुळेच झाडांची अशी निर्दयीपणे कत्तल करण्यात आल्याची चर्चा आहे.
व्यावसायिक फायद्यासाठी अवैधरित्या झाडांची कापणी ?
रिंग रोडवर सुमारे 600 झाडांच्या अवैध पद्धतीने केलेल्या कापणीबद्दल पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी झाड कापणाऱ्या मजुरांची ओळख पटवली असून त्यांना बोलावून त्यांची चौकशी ही केली आहे. तसेच त्यांनी झाड कापण्याचे निर्देश देणाऱ्या कंत्राटदाराची माहिती पोलिसांना दिली असून त्या कंत्राटदाराचा शोध सध्या सुरू आहे. झाडांची अवैध पद्धतीने कापणी केल्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.