Published On : Fri, Jun 19th, 2020

बांबूची अर्थव्यवस्था आदिवासी-शेतकर्‍यांचे जीवन बदलू शकते : नितीन गडकरी

बांबूची ग्रामीण भागातील उद्योजकता यावरील ई संवाद

नागपूर: कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्र हे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले असून बांबूची अर्थव्यवस्था आदिवासी, शेतकरी आणि गरीबांचे जीवन बदलू शकते, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Advertisement

बांबूची ग्रामीण भागातील उद्योजकता यावरील ई संवादात ते कोकण बांबू आणि केन डेव्हलपमेंट सेंटरच्या पदाधिकार्‍यांशी बोलत होते. बांबूच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता प्रतिपादित करताना गडकरी म्हणाले- बांबूच्या उद्योगाचे खूप मोठे स्वरूप असेल, तरच मोठ्या प्रमाणात रेाजगार निर्माण होईल आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. बाजाराला काय हवे त्यानुसार बांबूच्या वस्तूंचे डिझाईन तयार झाले पाहिजे. आमच्याकडे बांबू उद्योगात अपेक्षित रोजगार निर्माण झाला नाही. एक एकर शेतीत 200 टन बांबू निघू शकतो. त्यापासून तेल काढून बायो इथेनॉल निर्मिती होऊ शकते काय, यावर संशोधनाची गरज आहे.

आपल्या कृषी क्षेत्रासमोर आज अनेक आव्हाने आहेत. 3 वर्षे पुरतील एवढे गहू, तांदूळ, साखर आपल्याकडे आहेत. धान्य ठेवायला आता जागा नाही. म्हणूनच धान्यापासून इथेनॉल किंवा सॅनिटायझर बनविण्याची कल्पना समोर आली आहे. त्यामुळे 20 हजार कोटीची इथेनॉलची अर्थव्यवस्था 1 लाख कोटीपर्यंत जाऊ शकते. ग्रामीण, आदिवासी क्षेत्रातील 115 जिल्ह्यांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आजही खूपच कमी आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असतो. वन आणि कृषी विभागाकडे आज मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा उपलब्ध आहेत. या जागांवर बांबूची लागवड शक्य आहे. शासकीय संस्थांकडे अशा अनेक जागा मोकळ्या आहेत, पण त्या जागांचा उपयोग केला जात नाही. खुल्या जागांवर बांबू लागवड झाली तर पर्यावरण चांगले राखण्यासही त्याचा फायदा होणार आहे, असेही ते म्हणाले.

बांबू उद्योगातून रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले- सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्रात बांबूचा मोठा प्रकल्प सुरु झाला, तर रोजगार निर्माण होईल. बांबू क्लस्टर तयार झाले पाहिजे, आपण त्यासाठी मदत करण्यास असल्याचेही ते म्हणाले. बांबूचे ठोक उद्योग निर्माण झाले तर शेतकर्‍यांचे, गरीबांचे जीवनही त्यांतून सुधारणार आहे. अशा वेळी मग शेतकरीही पारंपरिक पिकांऐवजी बांबूच्या पिकाकडे वळतील. आज 40 हजार कोटींच्या न्यूज प्रिंटची आपण आयात करतो. न्यूजप्रिंटसाठी आमच्या बांबूचा उपयोग होऊ शकणार नाही काय, याचा विचारही झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

बांबूंपासून कपडा बनविता येईल काय? विविध पध्दतीचे कपडे बनविले गेले तर लोक त्याकडे आकर्षित होतील. नवीन संशोधन, जागतिक स्तरावर यशस्वी झालेले प्रयोग यामुळेच आपली अर्थव्यवस्था अधिक गतीने पुढे जाणार आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात उद्योगांचा विकास व्हावा असे सांगताना ते म्हणाले- तेथेच विविध उद्योगांचे क्लस्टर निर्माण झाले पाहिजेत, स्मार्ट व्हिलेज, स्मार्ट सिटी, अन्य सुविधा उपलब्ध झाल्या तर तेथील जीवनपध्दती उंचावेल व रोजगार निर्माण होऊन कुणी शहराकडे येणार नाही, असेही शेवटी गडकरी म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement