Published On : Fri, Jun 19th, 2020

परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्याची क्षमता देशातील उद्योगांमध्ये : नितीन गडकरी

Advertisement

‘रिजनरेटिव्ह इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन’वर ई संवाद

नागपूर: भारतातील विविध उद्योगांमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आहे. या दृष्टीने अभ्यास सुरु असून सुधारणा, परिवर्तन आणि कृती या माध्यमातून देशाचा विकास संभव आहे. हाच आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

‘रिजनरेटिव्ह इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन’वर ई संवादाच्या माध्यमातून गडकरी बोलत होते. कोरोनाचा सामना संपूर्ण जग करीत आहे. अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरित परिणाम झाला आहे. सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न 29 टक्के आहे. 48 टक्के निर्यात या विभागाची असून 11 कोटी रोजगार या विभागाने निर्माण केले आहे. कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राचा विचार केला तर या क्षेत्राचे सकल राष्ट्रीय उत्पन्न अत्यंत कमी आहे. आज 115 जिल्हे विविध समस्यांचा सामना करीत आहेत, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले- आपल्याकडे कौशल्य असलेले कामगार आहेत, कच्चा माल आहे, बाजारपेठ आहे, उच्च तंत्रज्ञान आहे. याद्वारे या भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढून सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल.

आयात कमी करून निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने गेल्या 3 वर्षाचा अभ्यास करण्यात येत आहे. 7 लाख कोटींचे क्रूड ऑईल आयात केले जात आहे. पण ग्रामीण उद्योगाच्या माध्यमातून इथेनॉल, बायो सीएनजीची निर्मिती झाली तर क्रूड ऑईलची आयात कमी होईल. इथेनॉलची अर्थव्यवस्था वाढेल. जलवाहतुकीत रोजगार आणि विकासाची खूप क्षमता आहे. विविध प्रकारची जलवाहतूक करणे आपल्या देशात शक्य आहे. त्यामुळे विदेशी पर्यटक आकर्षित होऊ शकतात. परिणामी परकीय गुंतवणुकीस चालना मिळू शकते. 2 लाख किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जात आहेत. यात 22 ‘ग्रीन हायवे’ आहेत.

महामार्गाशेजारी असलेल्या जागांवर हॉटेल, रेस्टॉरंट, पेट्रोल पंप, लॉजिस्टिक पार्क, स्मार्ट व्हिलेज, स्मार्ट सिटी असे क्लस्टर निर्माण केले रोजगारात वाढ होईल व अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही ते म्हणाले.

नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, विज्ञान, कौशल्य आणि यशस्वी प्रयोगांचे अनुभव या द्वारे भारतीय उत्पादने निर्यातीस मोठी संधी उपलब्ध होऊ शकते, असे सांगताना गडकरी म्हणाले- विविध क्षेत्रात असलेल्या गुंतवणुकीच्या संधी पाहता भारतीय अर्थव्यवस्था जलद गतीने वाढू शकते. एमएसएमई आता स्टॉक एक्स्चेंच्या मार्फत भांडवली बाजारात प्रवेश करणार आहे. यामुळे या विभागाकडे भांडवल उपलब्ध होईल. इन्शुरन्स अर्थव्यवस्था, पेन्शन अर्थव्यवस्था आणि स्टॉक एक्स्चेंज या तीनही क्षेत्रात देशातील गुंतवणुकीसह परकीय गुंतवणूक होण्यास मोठी संधी उपलब्ध आहे. अशाच सुधारणा, परिवर्तन आणि कृतीने आपली अर्थव्यवस्था मोठी होणार आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक युध्दाचा सामना करण्यास आपण सक्षम होणार आहोत, असेही ते म्हणाले.