छत्रपतींच्या पुतळयाला वादळीवाऱ्यांचा धोका नाही असे डिझाईन आम्ही तयार केले होते – जयंत पाटील

Advertisement

Jayant Patil

नागपूर : कोणत्याही प्रकारचे वादळी वारे आले तरी अरबी समुद्रातील छत्रपतींच्या पुतळयाला धक्का लागू शकत नाही अशी व्यवस्था असलेले डिझाईन गठीत करण्यात आलेल्या समितीचा अध्यक्ष म्हणून आम्ही तयार केले होते असा दावा आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाची उंची सरकार वादळी-वाऱ्याचे कारण देवून कमी करण्याचा घाट घालत असल्याने हा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. त्यावर आजही सभागृहात जोरदार चर्चा झाली. या चर्चेत बोलताना आमदार जयंत पाटील यांनी पुतळयाची उंची कमी करण्याचे कोणतेच कारण नाही असे स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण जगातील सर्वात उंच स्मारक तयार करत आहोत. त्यातच छत्रपतींच्या पुतळ्याबाबत मुख्यमंत्री जी कारणे देत आहेत ती तकलादू कारण आहे. केंद्रीय पर्यावरण खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ४४ मीटरने छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे आम्ही हे खपवून घेणार नाही असा इशारा देतानाच दिल्ली आणि महाराष्ट्राचं सरकार थापाडे आहे अशी जोरदार टिकाही केली.