छत्रपतींना दुजाभाव कोण दाखवत असेल तर खपवून घेणार नाही – अजित पवार

Advertisement

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांना दुजाभाव दाखवण्याचा धंदा कोणी करत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही असा इशारा देतानाच खरे काय आहे हे सरकारने स्पष्ट करायला हवे, अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

विधानसभेत आजही मुंबईच्या अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या उंचीचा विषय गाजला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची उंची सरकार कमी करत असल्याची बाब विरोधकांनी लावून धरली आणि छत्रपतींचा पुतळा एक इंचही कमी होवू देणार नाही असा पवित्रा घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. असा इशारा यावेळी पवार यांनी सरकारला दिल.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आली नाही असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. मात्र आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पुतळ्याची उंची १६० मीटरवरुन १२६ वर आणली आहे. सरकारने असे करण्याचे कारण काय ? सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची ही सर्वात मोठी रहावी म्हणून महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली जात असल्याचे म्हटले जात आहे हे खरे आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबत आम्हाला आदर आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सर्वात मोठा होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. शिवाय सरकारकडून वारंवार या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही सांगितले गेले होते मग असे का घडत आहे ? असा संतप्त सवालही पवार यांनी केला.