नागपूर : जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण कामगिरी करणाऱ्या नागपूरच्या ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखचा भव्य सत्कार शनिवारी (२ ऑगस्ट २०२५) नागपूरच्या सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिव्याला ३ कोटी रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढत राजकारण आणि बुद्धीबळ यामधील साम्य अधोरेखित केले.
कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, “दिव्याने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली असून तिचा सत्कार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं गौरवक्षण आहे. तिच्या सत्काराचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळात मंजूर करताना आम्हा सर्वांना अभिमान वाटला.”
यावेळी त्यांनी एक दिलखुलास आठवण सांगितली. मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान दिव्याच्या सत्काराचा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा मंत्री छगन भुजबळ मिश्कीलपणे म्हणाले, “नागपूरच्या लोकांची बुद्धी काही अधिकच तेजस्वी आहे, त्यामुळे तिथूनच बुद्धीबळाचे खेळाडू घडतात.”
या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, “खरंच आहे, आम्हीही बुद्धीबळ खेळतो… पण ते राजकारणाचं! आमच्याही खेळात चेकमेट आणि नॉकआऊट असतात. राजकारण हीसुद्धा एक शह-काटशहाची लढाई आहे.”
या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिव्याचं कौतुक करत सांगितलं की, “तिचं यश संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. नागपूरच्या मुलीने जागतिक स्तरावर मिळवलेलं हे यश प्रत्येक तरुणासाठी दिशादर्शक आहे.”