नागपूर : नागपूरमधील बालासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघडकीस आली आहे. बुधवारी रात्री जंगलातून आलेल्या नर बिबट्याने थेट प्राणीसंग्रहालयात घुसखोरी केली आणि पिंजऱ्यात बंद असलेल्या मादी बिबट्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या भीषण झुंजीत गंभीर जखमी झालेल्या मादी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने वन विभाग आणि प्राणीसंग्रहालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बाहेरून आलेल्या नर बिबट्याला मादीची वास किंवा आवाजामुळे पिंजऱ्याजवळ आकर्षित झाल्याचा संशय आहे. त्यानंतर दोघांमध्ये झुंज झाली आणि मादी गंभीर जखमी झाली. तातडीने उपचार सुरू करण्यात आले, मात्र दोन दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात अंतर्गत दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेनंतर गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली असून, आता संपूर्ण परिसरात वायर फेन्सिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक देखरेख यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही गोरेवाडा झूमध्ये जंगलातील बिबट्यांची घुसखोरी झाल्याचे प्रकार घडले आहेत. १९१४ हेक्टरमध्ये विस्तारलेल्या या प्राणी उद्यानात सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कता आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आता यानंतर प्रशासनाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.