Published On : Mon, Apr 2nd, 2018

हुडकेश्वर-नरसाळा भागात 30 जूनपर्यंत पाणी येणार


नागपूर: हुडकेश्वर आणि नरसाळा हा भाग महापालिकेला जोडला गेला आहे. या भागात नव्याने पाणीपुरवठ्याचे नेटवर्क टाकण्यात आले असून पाणीपुरवठ्यांच्या टाक्यांचे कामही सुरु आहे. चार टाक्यांपैकी एक टाकी 15 मे पर्यंत, एक टाकी 31 मे पर्यंत व उर्वरित दोन टाक्या 30 जूनपर्यंत पूर्ण होऊन पाणीपुरवठ्यासाठी जोडल्या जातील, अशी माहिती आज मनपा आयुक्तांनी बैठकीत दिली.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हुडकेश्वर नरसाळा येथील विविध विकास कामांचा आढावा घेतला. मनपाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला आयुक्त अश्विन मुद्गल, स्थायी समिती अध्यक्ष विक्की कुकरेजा व नगरसेवक उपस्थित होते. चंद्रभागानगर, संभाजीनगर, भारतमाता नगर, सावरबांधे लेआऊट या चार पाण्याच्या टाक्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हुडकेश्वरचे नेटवर्क 87 किमीचे असून 63 किमी पूर्ण झाले आहे. उर्वरित 24 किमीच्या भागात केवळ लेआऊट आहे. वस्ती नसल्यामुळे येथे नेटवर्क तूर्तास होणार नाही. नरसाळा गावात 66 किमी पाईपलाईनचे काम असून यापैकी 54 किमी पाईपलाईनचे काम झाले आहे. येत्या 30 जूनपर्यंत या दोन्ही भागाला पाणी मिळणार असल्याचे आयुक्तांनी बैठकीत सांगितले.

हुडकेश्वर नरसाळाचा शहर विकास आराखडा राज्याच्या नगर रचना विभागाला पाठविण्यात आला आहे. याशिवाय भूमिगत नाली व रस्त्यांसा़ठी 64 कोटी लागणार आहे. शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता नाही, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. हुडकेश्वर नरसाळा येथे दोन मोठे बगिच्यांचे काम सुरु झाले आहे. या कामाचे कार्यादेशही देण्यात आले. हुडकेश्वर येथे 1.62 कोटी व नरसाळा येथे 2.2 कोटी रुपये खर्च करून हे बगिचे होणार आहेत. रस्त्यांच्या 11 कामांसाठी 14.79 कोटी रुपयांच्या खर्चात 15.29 किमी लांबीचे रस्ते होतील. नरसाळा येथे 17.46 कोटी रुपयांमध्ये 6 किमी लांबीच्या 7 रस्त्यांची कामे होणार आहेत. याशिवाय नरसाळा हुडकेश्वर नाला संरक्षण भिंतीसाठी 70 कोटी रुपये खर्च होणार आहे.

नरसाळा दलित वस्तीतील 5 कामे मंजूर करण्यात आली आहे. या कामांवर 2.94 कोटी रुपये खर्च येणार आहे. हुडकेश्वर येथे 2.80 कोटीचे कामे दलित वस्तीत प्रस्तावित आहे.

भांडेवाडी डंपिंग यार्ड
भांडेवाडी डंपिंग यार्ड येेथे कचरा जाळण्याच्या तक्रारी करण्यात आल्यावरून आजच्या बैठकीत वस्तीशेजारी मोठी संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कचर्‍यापासून वीजप्रक़ल्प सुरु करण्यात येणार असून यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे. येत्या 7 एप्रिल रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मनपा आयुक्त या ठिकाणी भेट देणार आहेत.