Published On : Mon, Apr 2nd, 2018

नागपूरातील ५ डॉक्टर्स व आरएनएच हॉस्पिटल विरुद्ध वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार

Jago Grahak Jago
नागपूर: डॉ. राजेश सिंघानिया, डॉ. दिलीप राठी, डॉ. निता राठी, डॉ. देवेन ठाकूर, डॉ. शाहनवाज सिद्धिकी व धंतोली येथील आरएनएच हॉस्पिटल यांच्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याकडून २ कोटी ६० लाख रुपये भरपाईची मागणी करण्यात आली आहे.

पारगतपालसिंग भट्टी असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते दीक्षितनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी कवलनयन कौर (५३) यांना हर्निया आजार होता. त्यांच्यावर आरएनएच हॉस्पिटलमध्ये ६ जून २०१७ रोजी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पोटात असह्य वेदना होत होत्या. ७ जून रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांना रक्ताची उलटी झाली होती. डॉक्टर्सनी त्यांच्यावर तात्पुरता उपचार केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. रक्ताच्या उलट्या थांबल्या नाही. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असे भट्टी यांचे म्हणणे आहे.

भट्टी यांच्यावर दोन हृदयशस्त्रक्रिया झाल्या असून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या पत्नी शिक्षिका होत्या. त्यांच्या वेतनावर कुटुंब चालत होते. त्यामुळे २ कोटी ६० लाख रुपये भरपाई देण्यात यावी असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. आयोगाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणावर १८ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. तक्रारकर्त्यातर्फे अ‍ॅड. सौमित्र पालिवाल यांनी बाजू मांडली.