Published On : Fri, Aug 16th, 2019

नाग-पोहरा नदीवरील शेतकर्‍यांचे थेंबभरही पाणी कमी होणार नाही : पालकमंत्री

Advertisement

आडका येथे झाला शेतकर्‍यांशी संवाद

नागपूर: नाग-पोहरा नदीच्या काठावरील ज्या गावांमधील शेतकरी या दोन्ही नद्यांमधील पाण्यावर शेती करतात त्या शेतकर्‍यांचे एक थेंबही पाणी कमी होणार नाही असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधताना आडका या गावात दिले.

या नदीच्या काठावरील शेतकर्‍यांना पाणी मिळणार नाही. सांडपाण्याचे करार केले जातात आहेत, असा गैरसमज पसरवून देण्याचा प्रयत्न काही काँग्रेसच्या तथाकथित व स्वयंघोषित नेत्यांनी केला होता. या शेतकर्‍यांना पालकमंत्री बावनकुळे यांनी वस्तुस्थिती समजून सांगितली. या दोन्ही नद्यांमधून सांडपाणी गोसीखुर्द नदीत जात आहे. त्यामुळे गोसीखुर्दचे पाणी दूषित झाले. हे पाणी महापालिकेने शहराला पाणीपुरवठा केल्यानंतर निर्माण झालेले सांडपाणी आहे. परिणामी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने व न्यायालयाने मनपाला नोटीस बजावून या सांडपाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत, हे मनपाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

या सांडपाण्यामुळे गोसीखुर्द आणि नाल्यालगतचे नैसर्गिक पाण्याचे स्रोतही दूषित होत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. यावर उपाययोजना म्हणून मनपाने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी महानिर्मितीला दिले. त्याबदल्यात मनपाला दरवर्षी कोट्यवधीचा महसूल मिळाला. आता तोतलाडोह धरणात पाणी नाही. त्यामुळे पेंचही कोरडे आहे. परिणामी मनपाला शहराला पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य नाही. शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा सुरु आहे. मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे तोतलाडोहमध्ये येणारे पाणी थांबले. सध्या नागपूर शहरातील धरणातील डेड स्टॉकमधून पाणी देणे सुरु आहे. पाणीपुरवठ्याची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.

यावर उपाययोजना म्हणून लोहडोंगरी येथून कन्हान नदी तोतलाडोहमध्ये आणण्याचा प्रकल्प शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे नाग आणि पोहरा नदीत पाणी येणार आहे. तसेच एकूण सांडपाण्यापैकी फक्त 25 टक्केच पाणी आतापर्यंत शेतकरी उचलत होते. 75 टक्के पाणी वाहून जात होते. तोतलाडोहमधून कोराडी वीजनिर्मिती केंद्राला मिळणारे स्वच्छ पाणी केंव्हाच बंद झाले आहे. कोराडी पॉवर स्टेशन हे सांडपाण्यावर सुरु आहे. नदीतील सांडपाणी सीवेज ट्रीटमेंट प्लांटच्या माध्यमातून स्वच्छ करून नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत आणि गोसीखुर्दचे पाणी दूषित होणार नाही.

हे पाणी शेतकर्‍यांना वापरण्यासाठीच सोडले जाणार आहे. तसे या नद्यांमध्ये 13 बंधारे बांधून पाणी अडवले जाणार असून यापैकी 5 बंधार्‍यांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. 8 बंधारे पोहरा नदीवर होणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना बंधार्‍यांमधून स्वच्छ पाणी घेता येणार आहे. जेवढे लागेल तेवढे पाणी शेतकर्‍यांना उपलब्ध होईल. तोतलाडोहला पाणी आले की, 220 एमएलडी पाणी नदीत राहणार आहे. शेतकर्‍यांना लागणारे 100 टक्के पाणी सोडले जाईल. एक थेंबही कमी होणार नाही. शेतकर्‍यांमध्ये गैरसमज पसरविला जात आहे. पाण्याचे राजकारण केले जात असल्याचेही पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांना सांगितले.
या बैठकीला जि.प. सीईओ संजय यादव, अनिल निधान, योगेश वाडीभस्मे, रमेश चिकटे, मनोज चवरे, सरपंच भावना चांभारे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.