Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 23rd, 2018

  पाण्याच्या टाक्यांवर सफाईच्या तारखा कित्येक महिने ‘जुन्या’, नागरिकांच्या आरोग्याशी होतोय ‘खेळ’?

  Mayo Hospital Water Tanks, Nagpur

  नागपूर: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो) परिसरातील पाण्याच्या टाक्यांची मागील गेल्या कित्येक महिन्यांपासून सफाई होत नसून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी नागपूर टुडे प्रतिनिधीने मंगळवारी मेयोच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. मांजरेकर यांची भेट घेतली.

  पाण्याच्या टाक्यांची नियमित सफाई होत नसल्याचे डॉ. मांजरेकर यांनी स्पष्ट शब्दांत नाकारले. दर महिन्याला किंवा दोन महिन्यांनी सार्वजनिक Mayo Hospital Water Tanks, Nagpurबांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) स्वच्छता विभागाकडून सदर टाक्यांची नियमित सफाई होते, असे त्या म्हणाल्या. असे असताना टाक्यांवर सफाईच्या तारखेची नोंद का नाही असे विचारले असता, सफाई कर्मचारी तारखा नोंदवत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आम्ही सफाईचा अहवाल मागवल्यानंतर सुद्धा पीडब्ल्यूडी खात्याकडून सदर माहिती पाठवली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. सफाईची तारीख टाक्यांवर नोंदवणे बंधनकारक असल्याचे ध्यानात आणून दिल्यानंतर आम्ही आता कर्मचाऱ्यांना तसे आदेश देऊ असे म्हणतानाच केवळ तारीख टाकल्याने टाकी साफ झाल्याचे सिद्ध होते का, आणि तसे असेल तर चांगलेच आहे, असे व्यंगात्मक वक्तव्य मांजरेकर यांनी केले.

  सर्जिकल वॉर्डमधील सगळे वॉटर फिल्टर्स बंद असल्याकडे लक्ष वेधले असता, इस्पितळात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी सदर फिल्टर्सच्या तोट्या आणि त्याला जोडलेले अॅक्वागार्ड सुद्धा चोरून नेल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे डॉ. मांजरेकर म्हणाल्या. प्रसाधनगृहांची देखील हीच स्थिती असून त्यामुळेच वॉर्डातील जवळजवळ सगळी प्रसाधनगृहे दुरुस्तीसाठी कुलूपबंद ठेवल्याचे त्यांनी सांगितले. ही दुरुस्ती आणि नवे वॉटर कुलर तसेच नळतोट्या व इतर साहित्य बसवण्यासाठी तब्बल २६ लक्ष रुपये खर्च येणार असल्याचे डॉ. मांजरेकर म्हणाल्या.

  हॉस्पिटलमध्ये स्वच्छता आणि इतर कामांसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याचे सुद्धा त्या म्हणाल्या. त्यासाठी नुकतेच भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) या नावाजलेल्या संस्थेला ३ कोटी ८६ लाखांमध्ये ११ महिन्यांचे कंत्राट देण्यात आल्याची माहिती डॉ. मांजरेकर यांनी दिली. या संस्थेकडे राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, दिल्ली (‘एम्स’) यांच्या सफाईचे कंत्राट आहे. १० मे पासून “बीव्हीजी”चे काम सुरु झाले असून त्यांचे २२० कर्मचारी मेयोच्या ओपीडी, आपत्कालीन विभाग (casualty), आणि सर्जिकल वॉर्ड, स्त्रीचिकित्सा विभाग येथे सेवा देत असल्याचे मांजेरकर यांनी सांगितले. स्वच्छतेसाठी अशी संस्था नियुक्त करणारे ‘मेयो’ हे महाराष्ट्रातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालय असल्याचे त्या म्हणाल्या.

  Dr Manjrekar
  इस्पितळात येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मानसिकता बदलली नाही तर मेयोमधील परिस्थिती बदलणार नाही. आम्ही तर आमच्या परीने प्रयत्न करतोच आहोत पण नागरिकांनी देखील त्यांच्या नैतिक जबाबदारीचे पालन करून आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. मांजरेकर यांनी केले.

  —Swapnil Bhogekar


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145