Published On : Sat, Jul 13th, 2019

तर बिडगावला टँकरने पाणीपुरवठा करू : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

नागपूर : रस्ते, वीज, पाण्यासह नागरी सुविधांची मागणी हा नागरिकांचा हक्क आहे. या सुविधा पुरविण्यास शासन कटिबध्द आहे. बिडगाव हा शहरालगतचा भाग असून या भागात पाणीटंचाई असेल तर टँकरने पाणीपुरवठा करू पण नागरिकांना पाणी देऊ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागरिकांना दिली.

बिडगाव येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कामठी पंसच्या सभापती अनिता चिकटे, जि.प. सदस्य विनोद पाटील, अनिल निधान, रमेश चिकटे, रामकृष्ण वंजारी, राजकुमार घुले, प्रमोद कातुरे, श्रीपालजी कातुरे, सरपंच निकेश कातुरे व उपसरपंच संतोष तिजारे उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी सुरुवातीला उपस्थित सर्व नागरिकांकडून समस्यांचे अर्ज स्वीकारले आणि संबंधित अधिकार्‍यांच्या स्वाधीन केले.

तहसिलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला बाल कल्याण विभाग, कृषी विभाग, अन्न पुरवठा विभाग, महावितरण, शासनाच्या योजना, जि.प.मार्फत राबविण्यात येणार्‍या योजना आदी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांनी आपापल्या विभागामार्फत बिडगाव आणि शेजारील 15 गावांमध्ये सुरु असलेल्या कामांची माहिती जनतेसमोर सादर केली. माहिती सादर केल्यानंतर जनतेने केलेल्या प्रश्नांच्या मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांकडे पाठवून येत्या 8 दिवसात या कामांचे प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले.

नागपूरलगतचा हा भाग असूनही विकास कामे करण्यास वाव असल्याचे अधिकार्‍यांच्या आढाव्यातून आढळले. या भागातील जलस्रोत खोलवर गेल्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली आहे. परिणामी पाणीटंचाईचा सामना या भागाला करावा लागत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने या भागासाठी नळयोजना तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. तोपर्यंत या भागाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.

या जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून गरीब माणसाला थेट पालकमंत्र्याशी भेटण्याची, बोलण्याची आणि आपल्या समस्या सांगण्याची संधी प्राप्त झाली. आजच्या जनसंवाद कार्यक्रमात महिलांची संख्या अधिक होती व महिलांनी सर्वाधिक समस्या पालकमंत्र्यांकडे सादर केल्या. खरबी, बहादुरा, पांढुरना, परसोडी, खेडी, शिवडी, दिघोरी, नरसाळा, बिडगाव, पावनगाव आदी गावातील नागरिकांनी आपल्या समस्या या कार्यक्रमात मांडल्या. शेवटच्या माणसाची समस्या ऐकून घेईपर्यंत पालकमंत्र्यांनी नागरिकांना या कार्यक्रमाच्या माध्यमात वेळ दिला. मोठ्या संख्येने नागरिक व महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते.