| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Feb 4th, 2018

  भंडारा शहरासाठी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  भंडारा: रस्ते, पिण्याचे पाणी व भुयारी गटारे यासारख्या मूलभूत नागरी सुविधा शहराच्या विकासासाठी आवश्यक असून भंडारा शहरासाठी 120 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना, 60 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी 5 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देऊन भंडारा शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

  माधवनगर येथे भंडारा नगरपरिषद शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त भंडारा नगरपरिषद व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन घंटा वाजवून केले. भंडारा जिल्ह्याचा इतिहास मांडणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आय माईन्डस् इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 25 हजार रुपयांची देणगी देण्यात आली.

  यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळाभाऊ काशिवार, आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, मुख्याधिकारी अनिल अढागळे व लायन्स क्लबचे पदाधिकारी अन्य मान्यवर उपस्थित होते.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भंडारा नगरपरिषदेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. ही बाब गौरवास्पद आहे. भंडारा हे जिल्हा मुख्यालयाचे शहर असल्याने त्याअनुरूप शहराचा विकास करण्यावर यापुढे भर देण्यात येईल.

  ग्रामविकासाबरोबरच गावे व शहरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजना राबविण्यात येत आहे. स्वच्छता अभियान देशात आणि राज्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असून ग्रामीण व शहरी भागासाठी हे महत्त्वपूर्ण अभियान आहे. पिण्याचे पाणी, रस्ते व सांडपाणी या शहरासाठी मूलभूत सुविधा असतात. भंडारा शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी पाच कोटी रुपयांची, भुयारी गटार योजना 120 कोटी रुपयांची, पाणीपुरवठा योजना साठ कोटी रुपयांची आखण्यात आली असून या योजनांना मंजुरी देण्यात येईल. भंडारा शहरात शहरी आवास योजनाही प्रभावीपणे राबविण्यात येईल. झाडीपट्टीची संपन्न परंपरा असलेल्या भंडाऱ्यातील कलाकारांसाठी सुसज्ज नाट्यगृहाच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात येईल, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

  कर्जमाफीसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे. हमीभाव ठरविण्यासाठी सूत्र निश्चित करण्यात आले असून विविध योजनांच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात येत आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिला व तरूणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होत असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भंडारा जिल्हयासाठी विविध विकास योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन आणि विकास समितीद्वारे यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लवकरच पालकमंत्री पांदण रस्ता योजनेअंतर्गतही विविध कामे हाती घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145