Published On : Sun, Feb 4th, 2018

प्रजासत्ताक दिनातील पथसंचलनात प्रथम पुरस्कार मिळालेल्या चमूचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

Advertisement

नागपूर: प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने प्राचीन संस्कृतीची ओळख असलेल्या बरेली नृत्याचे बहारदार व मनमोहक दर्शन घडवून राज्याची ओळख निर्माण केली तसेच पथसंचलनात राज्याला प्रथम क्रमांक मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच आयुष्यातही यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात दिल्लीच्या पथसंचलनात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयी चमूचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही विजयी चमूचे अभिनंदन केले तसेच त्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे संचालक इंद्रजीत ग्रोवर तसेच दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे अधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

आपल्या देशात सर्वधर्म समभाव असून विविधतेत एकता आहे. ही आपल्याच भारतीय संस्कृतीची ओळख आहे. भारत एक जिवंत इतिहास असून भारतीय संस्कृतीची झलक येथील विविध नृत्य प्रकारात जाणवते. बरेली नृत्यामुळे मध्य प्रदेशातील प्राचीन संस्कृतीची ओळख संपूर्ण भारताला झाली. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. असे गौरवोद्गार विजयी चमूने सादर केलेल्या बरेली नृत्याच्या आविष्काराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे मध्यप्रदेश येथील बुंदेलखंड क्षेत्रातील बरेली नृत्याचे आज सादरीकरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नृत्य दिग्दर्शक किशोर हम्पीहोली, शिक्षकगण तसेच बरेली नृत्यात सहभागी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात आपल्या देशातील गणतंत्राकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य वेधले आहे. अशा सांस्कृतिक कार्यक्रमामुळे देशातील एकतेचे आणि संस्कृतीचे प्रदर्शन होते. भारतीय संस्कृती ही मुळातच कृषिप्रधान आहे. यामुळे येथील नृत्य प्रकारामध्ये संस्कृती, भाषा यांचा सुंदर मिलाप बघायला मिळतो. याची सुंदर प्रचिती विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बरेली नृत्यातून जाणवली. अशाच प्रकारे विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन पुरस्कार प्राप्त करुन महाराष्ट्राचे नाव देशात उज्वल करावे, अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राजपथावर सादर करण्यात आलेल्या बरेली नृत्यामध्ये एकूण 30 शाळेचे 174 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बरेली नृत्यातील विजयी चमूने समूह छायाचित्र काढले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती श्वेता शेलगावकर तर आभार वरिष्ठ लेखा व प्रशासकीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी मानले.