भंडारा, दि. ४:- स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राच्या भव्य व आकर्षक इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू, उपविभागीय अधिकारी बी.पी.पृथ्वीराज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक अजय शाहू उपस्थित होते.
लाल बहादूर शास्त्री ज्युनियर कॉलेज पटांगणाजवळ 1 कोटी 24 लाख रुपये खर्च करुन ही भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. याठिकाणी तरुण-तरुणींना स्वयंरोजगाराचे निवासी प्रशिक्षण देण्याची सोय आहे. यापूर्वी हे प्रशिक्षण केंद्र माविम कार्यालय मोहाडी येथे स्थित होते. मागील तीन वर्षात आरसेटी मार्फत 3411 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी 2209 उमेदवारांनी आपला रोजगार सुरु केला आहे. यापुढे नूतन इमारतीत प्रशिक्षण सोय असणार आहे.
महिला बचतगटांनी बनविलेली उत्पादने यावेळी मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आली. बचतगटांच्या महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थी तरुण-तरुणी व महिला बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या.