Published On : Fri, Mar 16th, 2018

रत्नागिरी पाणीपुरवठा योजनेचे काम गतिमान करण्याचे पाणीपुरवठामंत्र्यांचे निर्देश

Advertisement

मुंबई: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या रत्नागिरी येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मंजुर ११ योजनांचे प्रलंबित काम गतिमान करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

रत्नागिरी येथील विविध प्रलंबित पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात आज मंत्रालयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनाराण मिश्रा, ठाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, पनवेल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळचे अधीक्षक अभियंता देवेंद्र लांडगे, रत्नागिरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सावस्कर, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता श्री. मेंढे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या कासारवेली नळ पाणीपुरवठा योजना, भाट्ये नळ पाणीपुरवठा योजना, जयगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला.

यावेळी श्री.लोणीकर यांनी भाट्ये नळ पाणीपुरवठा योजनेची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जयगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या संबंधित कळझोंडी धरणाची उंची वाढविणे, मजबूतीकरण करणे, उर्ध्ववाहिनी यासारखी प्रलंबित तांत्रिक कामासाठी तांत्रिक मान्यता लवकरात लवकर देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.