Published On : Mon, Aug 13th, 2018

पाणी फाउंडेशनने सामान्‍य लोकांच्‍यातील असामान्‍यत्‍व जागृत केले – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

पुणे: कोणतीही योजना जनाधार असल्‍याशिवाय यशस्‍वी होत नाही. सामान्‍य लोकांच्‍यातील असामान्‍यत्‍व जागृत करण्‍याचे काम पाणी फाऊंडेशनने केले असून जलसंधारणाच्‍या कामाला जनाधार मिळवून देण्‍याचे काम केले असल्‍याचे गौरवोद्गार मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले. विजेत्‍या तीनही गावांना शासनाच्‍यावतीने प्रोत्‍साहनपर अनुक्रमे २५ लाख, १५ लाख व १० लाखांचे बक्षीस देणार असल्‍याचे मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्‍टेडीअममध्‍ये पाणी फाऊंडेशनच्‍यावतीने आयोजित सत्‍यमेव जयते वॉटर कप स्‍पर्धेच्‍या राज्‍यस्‍तरीय पुरस्‍काराचे वितरण मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदा राज्‍यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्‍ण विखे-पाटील, आमदार अजित पवार, अमृता देवेंद्र फडणवीस आदींची उपस्थिती होती.

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, गावा-गावात असणारे गट-तट हेच जलसंधारणाच्‍या कामातील मुख्‍य अडथळा होते. कोणतेही गाव जोपर्यंत पक्ष, गट, तट, जात, धर्म विसरत नाही तोपर्यंत गाव पाणीदार होत नाही, पाणी फाऊंडेशनने गावाची एकी करण्‍याचे काम केले. राज्‍यातील गावा-गावातील सामान्‍य लोकांना पाण्‍यासाठी एकत्र आणून पाणी चळवळ उभारण्‍याचे काम पाणी फाऊंडेशनने केले.

शासनाची कोणतीही योजना जनाधार असल्‍याशिवाय यशस्‍वी होत नाही. शासनाच्‍या जलयुक्‍त शिवार या योजनेला असाच प्रचंड जनाधार मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्‍या लोकांच्‍या मनात आत्‍मसन्‍मान जागृत केला, त्‍यामुळेच स्‍वराज्‍य निर्माण झाले. त्‍याच प्रमाणे महाराष्‍ट्रात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी राहीली आहे. त्‍यामुळे येत्‍या दोन ते तीन वर्षात महाराष्‍ट्र निश्चितच पाणीदार होणार असल्‍याचा विश्‍वास श्री. फडणवीस यांनी व्‍यक्‍त केला.

राज्‍य शासनाने सुरू केलेले जलयुक्‍त शिवार अभियान हे अत्‍यंत शास्‍त्रोक्‍त असून माथ्‍यापासून पायथ्‍यापर्यंत योग्‍य उपचार पध्‍दतीचा वापर करून जलसंधारणाचे काम सुरू आहे. पाण्‍याचे हे शास्‍त्र आपल्‍याला समजले आहे. मात्र यामध्‍ये आता सातत्‍य ठेवण्‍याची आवश्‍यकता आहे. जलसंधारणाच्‍या कामामुळे राज्‍यातील जमिनीखालची पाण्‍याची पातळी वाढत आहे, मात्र आता पाण्‍याच्‍या अनिर्बंध उपशावर नियंत्रण ठेवून पीक पध्‍दतीत आमुलाग्र बदल करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

राज्‍यमंत्री विजय शिवतारे म्‍हणाले, जलयुक्‍त शिवार योजनेच्‍या माध्‍यमातून जलसंधारणाची मोठी चळवळ मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुरू आहे. त्‍यामुळे एक दिवस नक्‍कीच महाराष्‍ट्र दुष्‍काळमुक्‍त होणार आहे. जलसंधारणाच्‍या कामाबरोबरच आमिर खान यांनी राज्‍यातील जनतेच्‍या मनसंधारणाचे काम केले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

आमिर खान म्‍हणाले, पाणी फाऊंडेशन हे तमाम महाराष्‍ट्रातील जनतेने बघितलेले स्‍वप्‍न आहे. महाराष्‍ट्राला समृध्‍द, पाणीदार बनविण्‍याचे हे स्‍वप्‍न आहे. हे स्‍वप्‍न साकार करण्‍याचे काम केवळ सरकार, कोणतीही सेवाभावी संस्‍थेचे नाही तर समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून काम केल्‍यासच ते साकार होणार आहे. स्‍वप्‍नपूर्तीची ही तर सुरूवात आहे. कोणत्‍याही गोष्‍टीची पूर्ती आपल्‍या हातात नसते मात्र ती गोष्‍ट पूर्ण करण्‍यासाठी लागणारा प्रवास आपल्‍या हातात असतो, तो अत्‍यंत प्रामाणिकपणे करण्‍याची आवश्‍यकता आहे. एक दिवस नक्‍कीच महाराष्‍ट्राचे स्‍वप्‍न पुर्ण होईल.

यावेळी अशोकराव चव्‍हाण, राज ठाकरे, किरण राव, राधाकृष्‍ण विखे-पाटील, आमदार अजित पवार यांची भाषणे झाली.

कार्यक्रमाच्‍या सुरूवातीला मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रथम क्रमांकाच्‍या सन्‍मानचिन्‍हाचे अनावरण करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सत्‍यजित भटकळ यांनी केले तर सूत्रसंचालन जितेंद्र जोशी, स्‍पृहा जोशी यांनी केले.

पाणी फाऊंडेशनचे राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार पुढील प्रमाणे

प्रथम क्रमांक – टाकेवाडी, ता. माण, जि. सातारा (७५ लाख व सन्‍माचिन्‍ह)

व्दितीय क्रमांक – विभागून १) भांडवली, ता. माण, जि. सातारा २) सिंदखेडा ता. मोताळा, जि. बुलडाणा (प्रत्‍येकी २५ लाख रूपये व मानचिन्‍ह)

तृतीय क्रमांक – विभागून १) आनंदवाडी, ता. आष्‍टी, जि. बीड, २) उमठा, ता. नरखेड, जि. नागपूर. (प्रत्‍येक २० लाख व मानचिन्‍ह)