Published On : Fri, May 31st, 2019

जलसंधारणाच्या कामांसाठी उपविभागीय अधिकार्‍यांनी दौरे करावे : पालकमंत्री

Advertisement

जलसंधारण कामांची आढावा बैठक

नागपूर: खनिज निधीतून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुरु असलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे उपलब्ध होणार्‍या पाण्याचे ऑडिट व्हावे. तसेच जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांनी ज्या गावांमध्ये कामे सुरु आहेत, त्या गावांचे दौरे करावे. तसेच जलसंधारणाच्या कामांसाठी व जनजागृतीसाठ़ी तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रशासनाला दिले. भविष्यात एकही गाव पाणीटंचाईचे राहणार नाही, या उद्देशाने ही कामे व्हावीत अशी अपेक्षाही त्यांनी केली. निधी आहे फक्त कामे गतीने पूर्ण करा, असेही ते म्हणाले.

जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिग, रिचार्ज शाफ्ट या विषयांच्या कामाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी घेतली. या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जि.प.चे कार्यकारी अभियंता, मजिप्राचे अधिकारी उपस्थित होते. पाणी फाऊंडेशनतर्फे नरखेड तालुक्यात होत असलेले काम चांगले झाले आहे. हे काम करण्यासाठी लोक स्वत:हून पुढे आले आहे. अशीच कामे जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये व्हावी अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच खनिज निधी व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जलसंधारणाच्या होणार्‍या सर्व कामाचे व्हिडिओ काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. नरखेड तालुक्यातील रामठी या गावातील पाण्याची पातळी शोष खड्ड्यांमुळे वाढल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

जलसंधारणाची यशस्वी कामे कशी होतील यासाठी पाणी फाऊंडेशनचे राज्यस्तरीय प्रशिक्षक अधिकार्‍यांना व सरपंच, सचिवांना प्रशिक्षण देतील. यासाठी तालुका निहाय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी. या शिबिरांचे यशस्वी आयोजन तहसिलदार आणि बीडीओंनी करावे. या शिबिराचा खर्च रोजगार हमी योजना विभागाने करावा. तसेच रोहयोमार्फत होणार्‍या कामांतून जलसंधारण साध्य होईल असा दृष्टिकोन ठेवून ही कामे केली जावीत. ही कामे करताना प्रत्येक तालुक्यात नाल्याचे ग्रीड तयार करा. नाले एकमेकांना जोडली गेली तर पूर येणार नाहीत व पाणी उपलब्ध राहणार आहे. 13 तालुक्यातील नाले जोडण्यासाठी ग्रीड तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. याच बैठकीत स्थानिक स्तर विभागाच्या अधिकार्‍यांचे ढेपाळलेले काम पाहता पालकमंत्र्यांनी त्यांच्याकडील काम काढून ते नासुप्रला देण्याचे निर्देश दिले.

रोजगार हमी योजना विभागाने महिलांचे बचत गट तयार करून शासकीय जागेवर बांबू लागवड व एका कुटुंबाला 2 झाडे ही योजना राबवावी. रोहयोतून महिला 206 रुपये मजुरी मिळेल व झाडे लागवड होईल. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात ही योजना राबवा. यातून महिला बचत गटाला वर्षभर काम मिळणार आहे. ‘रिचार्ज शाफ्ट’अंतर्गत जुन्या बोअरवेल, पाण्याचे स्रोत पुन्हा जिंवंत करता येऊ शकतात. जीएसडीए हे काम करीत आहे. या कामांसाठी अधिक प्रस्ताव पाठवा. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 10 गावांमधील बंद झालेले पाण्याचे स्रोत रिचार्ज करा. जि.प. सिंचन विभागातर्फे तालवांच्या दुरुस्ती व खोलीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 25 कोटींची 47 कामे सुरु आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून आणखी 17 कोटींची मागणी जि.प. सिंचन विभागाने केली आहे, अशी माहिती या बैठकीतून समोर आली.