Published On : Fri, Jul 5th, 2019

कचरा व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये जनसहभाग आवश्यक : पार्डीकर

कचरा व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा

नागपूर: आज सर्वत्र विकासाचा वेग वाढत असतानाच मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा ही सर्वांसाठीच मोठी समस्या आहे. प्रत्येक शहर, देश या सर्वांसाठीच कचरा ही गंभीर समस्या आहे. अशा स्थितीत या कच-याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) यांच्याकडून नागपूर महानगरपालिकेला मिळालेले सहकार्य व यासाठी पुढे आलेल्या विविध संघटना ही अभिनंदनीय बाब आहे. सर्वांच्या सोबतीने प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेसाठी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने व एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी)च्या सहकार्याने गुरुवारी (ता.४) रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे कचरा व्यवस्थापन विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उपमहापौर दीपराज पार्डीकर बोलत होते.

याप्रसंगी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सोनवणे, स्वच्छ भारत मिशन मनपा नागपूरचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, नाग नदी प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मो. इस्राईल, मनपाचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र जगताप, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूरच्या उपविभागीय अधिकारी हेमा देशपांडे, नीरीचे वरिष्ठ संशोधक व प्रमुख डॉ. अतुल नारायण वैद्य, बंगरुळु येथील हसीरु दालाच्या सहसंस्थापिका नलीनी शेखर, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संचालिका लीना बुधे, डॉ. प्रणीता उमरेडकर, क्लिन इंडिया मिशन अंबिकापुर छत्तीसगडचे सल्लागार नितेश शर्मा, एएफडीचे प्रकल्प व्यवस्थापक व्हॅलेन्टाईन लेन्फन्ट, हायस्त्राचे प्रकल्प व्यवस्थापक सिमॉन ब्रोसार्ड, हायस्त्राच्या सल्लागार ॲमी बेंडेल, स्वीस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एसडीसी)च्या भारतातील प्रमुख मॅरीलर क्रेट्झ, एसडीसीच्या तांत्रिक तज्ज्ञ साक्षी दासगुप्ता, झेन्टोचे सल्लागार अंशुल सुदान, नीरीचे संदीप बुरखे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नागपूरचे श्री. वानखेडे, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक देवेंद्र महाजन, नितेश शर्मा, डॉ. स्वप्नील कांबळे, अतुल वैद्य, डॉ. संदीप नारनवरे, डॉ. मानस बडगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे म्हणाले, कच-याचे व्यवस्थापन ही प्रत्येक शहरासाठी गंभीर बाब आहे. या समस्येबाबत कार्यशाळेत विविध संस्था, संघटनांनी आपल्या संकल्पनांचे आदान प्रदान करून नागपूर शहरासह इतर शहरांसाठीही मार्गदर्शक ठरावे असे महत्वाचे योगदान द्यावे, असेही ते म्हणाले.

कार्यशाळेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सादरीकरणाद्वारे कचरा व्यवस्थापनाचे महत्व, त्यावर उपाय व आपल्या संकल्पना स्पष्ट केल्या. बंगरुळु येथील हसीरु दालाच्या सहसंस्थापिका नलीनी शेखर यांनी कचरा व्यवस्थापनाबाबत हसीरु दालाच्या उत्कृष्ट पद्धतींची माहिती दिली. तर नितेश शर्मा यांनी कचरा व्यवस्थापनातील अंबिकापूरच्या उत्कृष्ट पद्धतीबाबत माहिती दिली. डॉ. वानखेडे व डॉ. वैद्य यांनी कचरा व्यवस्थापन प्रक्रियेतील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व नीरीच्या कार्याची माहिती दिली. याशिवाय मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी व सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुधे यांनी नागपुरातील संदर्भ, संधी आणि आव्हानाबाबत चर्चा केली. प्रास्ताविकात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कार्यशाळेची भूमिका विषद केली.