– शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करत त्यांची तुलना औरंगजेबशी केली होती. नरेंद्र मोदींचा जन्म गुजरातच्या ज्या गावात झाला,त्या गावाजवळच औरंगजेबाचा जन्म झाला होता. याच कारणामुळे मोदी हे औरंगजेबासारखा विचार करतात, अशा शब्दात राऊत यांनी मोदींवर हल्लाबोल केला. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र खरंच औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता का? याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत.
औरंगजेबाच्या जन्मांचे ठिकाण –
औरंगजेबाचा जन्म ३ नोव्हेंबर १६१८ मध्ये दोहाद (काही ठिकाणी दाहोद असाही उल्लेख आढळतो) येथे झाला होता. दोहाद हे ठिकाण सध्या गुजरातमध्ये आहे. औरंगजेब हा मुघल राजकुमार खुर्रम याचा तिसरा मुलगा होता. त्याला दारा शुकोह व शाह शुजा असे दोन मोठे भाऊ होते. राजकुमार खुर्रमला एकूण सहा अपत्ये होती. राजकुमार खुर्रमलाच पुढे मुघल सम्राट शहाजहाँ या नावाने ओळखले जाऊ लागले.
औरंगजेबाचे .आठव्या वर्षापर्यंत गुजरातमध्ये वास्तव्य –
औरंजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला आणि त्याचे बालपणही गुजरातमध्ये गेले. तो वयाच्या जवळपास आठव्या वर्षापर्यंत गुजरातमध्ये होता. पुढे १६२२ मध्ये राजकुमार खुर्रमने जहांगीरविरोधात बंड पुकारले; मात्र ते अपयशी ठरले. १६१८ च्या सुरुवातील मुघल सम्राट जहांगीरने राजकुमार खुर्रमला गुजरातचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. खुर्रमने बंड पुकारल्यानंतर जहांगीरने औरंगजेब आणि दारा शुकोह यांना बंदी बनवले होते. त्यामुळे खुर्रमने त्याचे बंड मागे घेतले. त्यानंतर त्याने औरंगजेब आणि दारा शुकोह यांना बंदी म्हणून लाहोर येथील जहांगीरच्या कोर्टात पाठविले, असा उल्लेख इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांच्या अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ औरंगजेब (१९३०) या पुस्तकात आढळतो. अन्य इतिहासकारांच्या मते १६२५ मध्ये खुर्रम आणि औरंगजेब यांची पुन्हा भेट झाली.
१७५९ पर्यंत गुजरातवर मुघलांचे राज्य –
मुघल साम्राज्यांच्या काळात गुजरात हा अतिशय महत्त्वाचा प्रांत होता. त्याच गुजरातमधील सुरत येथे १६१२ मध्ये ब्रिटिशांनी आपली पहिली औद्योगिक वसाहत स्थापन केली. त्यासाठी त्यांना मुघल बादशहा जहांगीरने परवानगी दिली. याचदरम्यान १६५७ ते १७०७ या काळात औरंगजेब मुघल बादशहा होता. याच काळात शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वाऱ्या केल्याने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणता राजकीय अस्थिरता बघायला मिळाली. जवळपास १७५९ पर्यंत गुजरातवर मुघलांचे राज्य होते. त्यानंतर गुजरात ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेल्याची माहिती इतिहासात नमूद आहे.