वर्धा : वर्ध्यातील ट्रान्सजेंडर महिला वकील शिवानी सुरकार आणि बँक कर्मचारी नितीन सोलंके यांनी चार वर्षांच्या प्रेमसंबंधाचे विवाहबंधनात रूपांतर करत समाजासमोर स्वीकार, समानता आणि प्रेमाचा आदर्श ठेवला आहे. विशेष विवाह अधिनियमांतर्गत विवाहाची नोंदणी केल्यानंतर दोघांनी अमरावती येथील लाखनवाडी हिंदू मंदिर ट्रस्टमध्ये वैदिक मंत्रोच्चार आणि हिंदू परंपरेनुसार सप्तपदी घेत विवाह केला.
माहितीनुसार, शिवानी आणि नितीन यांची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आपल्या नात्याला कायदेशीर आणि सामाजिक मान्यता मिळावी, या उद्देशाने दोघांनी २५ जून रोजी वर्धा येथे विशेष विवाह अधिनियमांतर्गत विवाहाची अधिकृत नोंदणी केली.
त्यानंतर ३१ जुलै रोजी कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अमरावतीतील लाखनवाडी हिंदू मंदिर ट्रस्टमध्ये वैदिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. मंत्रोच्चाराच्या साक्षीने सप्तपदी घेत दोघांनी आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली.
या विवाहाची चर्चा वर्धा, अमरावतीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भात होत आहे. सामाजिक स्वीकार, समान हक्क आणि बदलत्या समाजव्यवस्थेचे हे सकारात्मक उदाहरण असल्याच्या प्रतिक्रिया अनेक स्तरांतून व्यक्त होत आहेत. नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
प्रेम, परस्पर विश्वास आणि सन्मान हेच कोणत्याही नात्याचे खरे आधारस्तंभ असल्याचा संदेश या विवाहातून अधोरेखित झाल्याचेही बोलले जात आहे.





