नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील एक प्रतिष्ठित शासकीय कृषी महाविद्यालय असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सामान्यतः रात्रीच्या वेळी वसतिगृहातून विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास मनाई असते, पण येथे तर वसतिगृहाचा वार्डनच काही विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना घेऊन रात्री ९ ते १२ या वेळेत सिनेमा पाहण्यासाठी बाहेर घेऊन गेला, अशी माहिती पुढे आली आहे. या प्रकारामुळे वसतिगृह प्रशासनाच्या जबाबदारीवर आणि नियमनक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी विलास अतकरे यांच्याशी ‘नागपूर टुडे’ने संपर्क साधला. या घटनेसंदर्भात अतकरे म्हणाले की, वसतिगृहात घडलेला प्रकार निंदनीय असून संबंधित वार्डनवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.
शासन नियमांचा पायमल्ली, मुलींची सुरक्षा धोक्यात-
राज्य शासनाच्या वसतिगृह नियमावलीनुसार, महिला विद्यार्थिनींना ठराविक वेळेनंतर बाहेर जाण्यास मनाई आहे. मात्र, स्वतः वार्डनच जर या नियमाला हरताळ फासत असेल, तर संस्थेतील अन्य शिस्तीची काय अपेक्षा ठेवायची? हा प्रकार केवळ व्यवस्थेतील ढिसाळपणाच नव्हे, तर विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर आणि धोकादायक मानला जातो.
पालकांचा विश्वास डळमळीत , प्रशासन मौनधारी-
पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी वसतिगृहाचा निवड केली, मात्र वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांच्या संगतीने रात्रीच्या वेळेस सिनेमा पाहायला पाठवले जात असल्याची बातमी समजल्यानंतर पालकांचा विश्वास हादरला आहे.
महत्वाचं म्हणजे, या घटनेनंतरही कोणतीही स्पष्ट कारवाई झालेली नाही हे अधिक चिंताजनक आहे.
प्रश्नच प्रश्न – उत्तर कोण देणार –
-रात्र अपरात्री विद्यार्थिनींना घेऊन गेलेला वार्डन अजून सेवेत का आहे?
-प्राचार्य यावर मौन का बाळगून आहेत
-राज्य कृषी विद्यापीठ यावर काय भूमिका घेणार?
प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची जबाबदारी निश्चित-
या प्रकरणाकडे महिला आयोग, पालक संघटना आणि सामाजिक संस्थांकडून दखल घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ शिस्तभंग नाही, तर विद्यार्थिनींच्या मूलभूत सुरक्षेच्या अधिकारांचे उल्लंघन झालं आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर, वसतिगृहाच्या गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी व निलंबनाची कार्यवाही करणे आवश्यक आहे, अन्यथा अशा घटनांमुळे संस्थेच्या प्रतिमेलाच गालबोट लागू शकते.