
नागपूर – पश्चिम आशियात वाढत चाललेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांच्या हालचालींवर निर्बंध आणल्यामुळे संपूर्ण जगासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे तेल उत्पादक देशांसह ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम भारतावरही होताना दिसत आहे. नागपूरस्थित ‘कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड’ या कंपनीने भाड्याने घेतलेली एलपीजीची वाहतूक करणारी दोन जहाजे सध्या होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अडकून पडली आहेत. गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून ही जहाजे त्या परिसरात थांबलेली असून पुढील प्रवास करणे शक्य झालेले नाही.
दरम्यान, कतारने नैसर्गिक वायू उत्पादन तात्पुरते बंद केल्याची माहिती समोर आली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर काही आठवड्यांत अनेक तेल उत्पादक देशांना उत्पादन कमी करावे किंवा बंद करावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ९२ डॉलर्सच्या पुढे गेला असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ८५ टक्के कच्चे तेल परदेशातून आयात करतो. त्यातील अर्ध्याहून अधिक तेल होर्मुझच्या खाडीद्वारे भारतात येते. याच मार्गाने जवळपास ९० टक्के नैसर्गिक वायूही देशात पोहोचतो. हा मार्ग बंद राहिल्यास देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो. परिणामी इंधनदर वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, इराणने हैफा येथील इस्रायलमधील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या केंद्रामुळे इस्रायलमधील सुमारे ६० टक्के तेलपुरवठा प्रभावित झाल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर गेल्या काही दिवसांपासून हल्ले सुरू ठेवले असून संघर्ष आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत असून ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियात सुमारे ९० लाख भारतीय नागरिक काम करीत असल्याचे सांगितले जाते, तर इराणमध्ये सुमारे ९ हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वाढत्या तणावामुळे त्यांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी विमानसेवाही विस्कळीत झाली असून हजारो पर्यटक विविध देशांमध्ये अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. परिस्थिती किती दिवस कायम राहणार याबाबत अद्याप अनिश्चितता असल्याने जगभरातील देश परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.








