Published On : Mon, Jul 29th, 2019

भटकलेली विद्यार्थिनी नागपुरात सुखरूप

रेल्वे चाईल्ड लाईनची सतर्कता

Nagpur Railway station

नागपूर: तेलंगना येथील एका श्रीमंत घरची मुलगी अचानक भटकली आणि नागपूर रेल्वे स्थानकावर आली. रेल्वे कर्मचारी आणि चाईल्ड लाईन प्रतिनिधीच्या सतर्कतेमुळे ती सुखरुप आहे. असामाजिकतत्वाच्या हाती लागली असती तर तेलंगना, मेहबुबपूर येथील प्रिया (काल्पनिक नाव) १० व्या वर्गात शिकते. ती अंत्यत श्रीमंत घरची आहे. नेहमी प्रमाणे ती शाळेत गेली. मात्र, शाळेतून घरी परतलीच नाही. त्यामुळे नातेवाईकांनी तिचा शोध घेतला.

मात्र, ती कुठेच आढळून आली नाही. दरम्यान प्रिया घरी न जाता बिल्लारीला गेली. तेथून तिरूपती नंतर आज रविवारी ती नागपूर रेल्वे स्थानकावर आली. एका पार्सल कर्मचाºयाला ती भयभीत स्थितीत आढळली. त्यांनी तिची विचारपूस केली. मात्र, ती काहीच बोलत नसल्याने त्यांनी रेल्वे चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी दीपाली धमगाये यांना सांगितले. दीपाली यांनी लगेच प्रियाला कार्यालयात आणले. तिची आस्थेनी विचारपूस करून कुटुंबीयांची माहिती घेतली. वडिलांचा मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला.

दरम्यान प्रियाला लोहमार्ग ठाण्यात आणले. उपनिरीक्षक गोंडाणे आणि महिला पोलिस शिपायांच्या मदतीने प्रियाच्या वडिलांशी चर्चा केली. प्रिया सुखरुप असल्याचे सांगताच त्यांना दिलासा मिळाला. तिच्या वडिलांनी नागपुरला विमानाने येण्याची तयारी दर्शविली.

मात्र, नियोजित वेळेत ते नागपुरात पोहोचू शकत नसल्यामुळे तसेच प्रियाला रात्री ठाण्यात ठेवने नियमाच्या विरूध्द होईल. त्यामुळे तिला शासकीय वसतिगृहात पाठविण्यात आले. तशी माहिती तिच्या वडिलांनाही देण्यात आली. मंगळवारी समितीसमोर हजर करण्यात येईल. समिती कुटुंबीयांची खात्री करून योग्य निर्णय घेईल. तो पर्यंत प्रिया शासकीय वसतिगृहात सुरक्षित आहे.