Published On : Mon, Jul 29th, 2019

कळमना मार्गावर ऑटोमॅटिक सिग्नलिंग यंत्रणा

रेल्वे गाड्यांचा वेग वाढून होणार वेळेची बचत, ५३.४ कि.मी. पर्यंत कार्यान्वित

नागपूर: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. एकापेक्षा एक संगणकीकृत यंत्रणा विभागात येत असल्याचे कामाची गती वाढत आहे. त्याचाचा एक भाग म्हणून कळमना ते गोंदिया या ५३.४ कि.मी. पर्यंत ऑटोमॅटिक सिग्नललिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे रेल्वे गाड्यांचा वेग वाढून वेळेची बचतहोणार आहे. यासोबतच १२० च्या गतीने धावणाºया सेमी हायस्पीड रेल्वे गाड्या चालविण्याचीही तयारी होत आहे.

रेल्वेप्रवासात लागणारा वेळ कमी करण्याच्या द्ष्टीने रेल्वे प्रशासनाकडून पाऊले उचलली जात आहेत. ताशी १२० किमी वेग असणाºया सेमी हायस्पीड ट्रेन चालविण्याचा चंग बांधून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून रेल्वेमार्गांची संख्या वाढविणे, अस्तित्वातील रुळांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. या सोबतच स्वयंचलित सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येत आहे.

दक्षिण पूर्व रेल्वेच्या नागपूर विभागातही रेल्वेगाड्यांची गती वाढविण्याचे वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सिग्नल अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागाने तत्परतेने कळमना ते गोंदिया या १२४ किमी रेल्वे मार्गावर स्वयंचलित सिग्नलिंग व्यवस्था कार्यान्वित केली आहे. या मार्गावर एकूण १५ रेल्वेस्थानक आहेत. याशिवायही झोनमधील गोंदिया ते गुदमा हा १२ किमीचा मार्ग, गतौरा ते बिलासपूर हा ६.४ किमी रेलवे मार्ग, बिलासपूर ते बिल्हा हा १६ किमी आणि आमगाव ते सालेकसा या १९ किमी मार्गावर स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे रेल्वे गाड्यांचा वेग वाढून सरासरी वेळ कमी होणार आहे.

सेक्शनचे अंतर केले कमी
एक गाडी धावत असलेल्या रुळावर दुसºया गाडीला हिरवा सिग्नल मिळत नाही. परिणामी मागून येणाºया रेल्वेगाड्या थांबून असतात. आतापर्यंत दोन रेल्वेस्थानकांदरम्यान एक सेक्शन माणून सिग्नलिंग यंत्रणा विभागलेली असल्याने एक गाडी संपूर्ण सेक्शन पार करून गेल्याशिवाय अन्य गाड्या थांबूनच असायच्या. आता सेक्शनचे अंतर साधारणत: १ किमी अंतरावर आणण्यात आले आहे. म्हणजेच एक किमी पेक्षा जास्त अंतर असल्यास मागच्या गाडीला आपसुकच हिरवा सिग्नल मिळतो. ही संपूर्ण यंत्रणा संगणकाद्वारे स्वत:हूनच नियंत्रित होत असल्याने चुकांना स्थान नाही.