Published On : Mon, Jul 29th, 2019

नागपूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 1200 कोटी -फडणवीस

Advertisement

नागपूर : शासनाने राज्य पोलीस दलाचा गतीने विकास करण्यासाठी हजारो कोटी रूपयांचा निधी दिला असून त्यात नागपूर कुठेही मागे राहू नये म्हणून नागपूर पोलीस दलाच्या विकासासाठी व आधानुकीकरणासाठी 1200 कोटी रूपये मंजुर केले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

पोलीस लाईन टाकळी परिसरात पोलीस कर्मचा-यांसाठी बांधण्यात आलेल्या नुतन शासकीय पोलीस निवासस्थानाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

मंचावर केंद्रीय परिवहन व भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रविंद्र कदम प्रामुख्याने उपस्थित होते.

पोलीस गृह निर्माण व कल्याण मंडळाने जलदगतीने इमारतीचे गुणवत्तापुर्ण बांधकाम केल्याबाबत अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या इमारतीचे भूमीपूजन सन 2016 मध्ये करण्यात आले होते. तीन वर्षातच ही इमारत पोलीस दलाने बांधून पुर्ण केली. इतक्या गतीने व गुणवत्तापुर्ण काम झाल्याने खरोखरच पोलीस दलाची कार्यक्षमता वाढल्याचे दिसून येत असल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले. सन 1999 ला पोलीस लाईन टाकळी परिसराची अवस्था फार वाईट होती. या ठिकाणी राहत असलेल्या आमच्या पोलीस बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होते. या ठिकाणी आपण त्यावेळी भेट देऊन पोलीस विभागाच्या समस्या विधीमंडळात मांडल्या होत्या. त्यानंतर विकासासाठी निधी प्राप्त झाला.

आपल्यासाठी चोवीस तास अहोरात्र काम करणा-या पोलीस बांधवांसाठी चांगल्या निवासाची व्यवस्था व्हावी, तसेच त्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचा आपण निर्धार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून आज पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात आहे.

राज्य पोलीस दलाच्या विकासासाठी गृह विभागाला हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमधील व ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांच्या इमारतीचे आधुनिकीकरणाचे कामे जोमाने सुरू आहेत. पोलीसांच्या सुसज्ज अशा निवासस्थानाची व्यवस्था कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्यात 1 लाख घरे बांधण्यात येत आहेत. त्यात 30 हजार घरांची कामे प्रगतीपथवार असून त्यातील काही प्रकल्प पुर्ण झालेले आहेत. यामुळे पोलीसांची कार्यक्षमता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.

पोलीस अधिका-यांच्या निवासस्थानाप्रमाणेच ही पोलीस कर्मचा-यांची वसाहत तयार करण्यात आली असून या इमारतीत एकूण 280 सदानिका तयार करण्यात आल्या आहेत. यात पोलीस शिपाई पासून ते सहायक पोलीस उपनिरीक्षकापर्यंत कर्मचा-यांना निवासस्थान उपलब्ध करून दिला जाणार आहे. नागपूर पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून देशातील सर्वात स्मार्ट अशी ही इमारत राहणार आहे. यासह शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या इमारती नव्याने बांधण्यात येत आहेत. तसेच काही इमारतींचे नुतणीकरण सुरू आहेत. नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठीही शासनाने पाऊले उचलले असून लवकरच त्यांना सर्व सोयी उपलब्ध होणार आहेत.

पोलीसांच्या हक्कांच्या घरासाठी शासनातर्फे लागणा-या व्याजावर सबसिडी देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीसांना मालकी हक्काने घरे देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

निवृत्त पोलीसांना मोफत उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देत आहे. पोलीस पाल्यांच्या विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. पोलीसांच्या पाल्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्कुल तयार करण्याचा विचार शासनस्तारावर सुरू आहे. पोलीस विभागाने तात्काळ या प्रकारचा प्रस्ताव तयार केल्यास त्यास शासनाकडून मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, भूमीपुजनानंतर लोकार्पणाची संधी एवढ्या लवकर मिळेल, असे वाटले नव्हते. मात्र पोलीस दलाने वेगवान काम करून आपली कार्यक्षमता सिध्द केली असल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले. पोलीस विभागाने निवासस्थान बांधकामात उत्तम गुणवत्ता राखली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त श्री. गायकर, बिल्डर श्री. मेहता व आर्कीटेक्चर श्री. दाते यांचा सत्कार करण्यात आला. संचालन पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी केले. तर आभार सह पोलीस आयुक्त रविंद्र कदम यांनी मानले. कार्यक्रमात पोलीस उपायुक्त सर्वश्री चिन्मय पंडीत, विनीता शाहू, मोनीका राऊत यांच्यासह इतर भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.